गुरुवारी चौलनगरीत घुमणार दत्तनामाचा गजर
By निखिल म्हात्रे | Published: February 27, 2024 05:18 PM2024-02-27T17:18:31+5:302024-02-27T17:23:51+5:30
श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग - चौल भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांचा पायी पालखी परिक्रमा सोहळ्यास गुरुवार, दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. दरवर्षी पार पडणाऱ्या या सोहळ्यास वर्षागणिक उत्सवाचे स्वरुप प्राप्त होत असून, त्यानिमित्त चौलनगरी दत्तनामाच्या गजरात दुमदुमून जाणार आहे. यंदाचे हे पालखी परिक्रमेचे पाचवे वर्ष आहे.
श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. यादरम्यान दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर पुष्पवृष्टी, मंदिरात विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी होत असते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त मंडळ संस्थापक अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, चौल ग्रामस्थ व दत्तभक्त मेहनत घेत आहेत. सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी 9326968878 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल पालखीचा मार्ग
ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्तमंदिरात मार्गस्थ होणार आहे. दरवर्षी पालखीच्या वाटेवर ठिकठिकाणी दत्तभक्त तसेच ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबत, मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते. सुवासिनींकडून पालखी औक्षण करण्यात येते. पालखी परिक्रमेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती होणार आहे. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.