अलिबाग : पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील रावे आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरुच्या बनात एकूण ४२ हजार ४०० रुपये किमतीची गावठी दारू व रसायनांसह दारुभट्टी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रावे गावच्या पूर्वेकडील खाडीकिनारी भागात गावठी दारू तयार करणाऱ्या दोन भट्टींवर दादर सागरी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. या ठिकाणी सात प्लॅस्टिकच्या टाक्या, त्यातील १२५० लीटर गूळ-नवसागरमिश्रित रसायन असे एकूण २५ हजार ४०० रु पये किमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करून हातभट्टी शुक्रवारी उद्ध्वस्त केली आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनारी सुरुच्या बनात शनिवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास प्रभारी अधिकारी बाळकृष्ण जाधव व दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत, गावठी दारू निर्मितीसाठीचे १६ हजार रुपये किमतीचे ८०० लीटर नवसागरमिश्रित रसायन आणि सुमारे एक हजार रुपये किमतीचे दारू संकलनाचे ड्रम्स असा एकूण १७ हजार रुपये किमतीचा जमिनीत पुरलेला मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
पुगावमधून १६ हजार ७९६ रुपये किमतीचे मद्य जप्त
रायगड जिल्ह्यात अवैध दारूधंद्यावर कडक कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या धडक कारवाई सुरू आहे. गेल्या मंगळवारी कोलाड पोलिसांनी केलेल्या हॉटेलव लॉज तपासणी मोहिमेत पुगाव (रोहा) येथील नम्रता हॉटेल व लॉजमध्ये १६ हजार ७९६ रुपये किमतीचे मद्य जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई कोलाड पोलीस करीत आहेत. दोघांना २५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांत अटक सुभाष एकनाथ कार्ले आणि अशोक श्रीपाद सावंत या दोघांवर गुन्हा सिद्ध झाला असून कर्जत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांनी दोघांना २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.