दहीवलीत काव्यवाचनाने रंगले स्नेहसंमेलन
By admin | Published: January 4, 2016 02:01 AM2016-01-04T02:01:48+5:302016-01-04T02:01:48+5:30
‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते तेव्हा उभे राहतो आम्ही..., ‘जेवताना आजोबा लाडात येत मला आपल्या ताटातील भाकर देत..., हा असा पाऊस पडत असताना..
कर्जत : ‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते तेव्हा उभे राहतो आम्ही..., ‘जेवताना आजोबा लाडात येत मला आपल्या ताटातील भाकर देत..., हा असा पाऊस पडत असताना..., काळ्या आईच भांडण..., एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवला बाहेर थांबवतो..., ओळखलंत का सर मला..., थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या वेळी इंटरनेत नव्हतं... अशा मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, वैभव वैद्य, समीर सावंत, संदीप खरे या प्रसिद्ध लेखकांच्या एकापेक्षा एक कवितांचे वाचन करून उपस्थितांची वाहवा मिळविली. येथील दहीवली विभागात असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळ संचालित जनता विद्या मंदिर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध कवींच्या कवितावाचनाने रंगला. या प्रसंगी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे वाचन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या समारंभाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर कवी व लेखक विजय उतेकर, छत्रपती शिक्षण मंडळाचे चिटणीस वेणुनाथ कडू आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक किशोर तळेले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात विद्यालयाचा चढता आलेख सांगितला. शमा सिद्दिकी या विद्यार्थिनीने वार्षिक अहवाल सादर केला. कवी व लेखक विजय उतेकर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वेणुनाथ कडू यांनी भाषणात ज्ञान, रचना वाद व ज्ञानसाधना यांचा ऊहापोह करून जगाचा इतिहास आपल्याला माहीत असतो, परंतु आपल्या परिसराचा इतिहास माहित नसतो, तसेच इतिहासातील अनेकांच्या पिढ्या पाठ असतात, परंतु आपले पूर्वज हे माहीत नसतात; त्याची प्रथम माहिती करून घ्या, असा सल्ला दिला. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रतिभा उपासनी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)