दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:17 AM2018-09-15T03:17:38+5:302018-09-15T03:18:14+5:30
जिल्ह्यात विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था; टाळ-मृदुंगाचा गजर; समुद्रकिनारे, तलाव, नदी, खाड्यांमध्ये बाप्पाचे विसर्जन
अलिबाग : दीड दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाच्या जयघोषाला टाळ मृदुंगाचा चांगलाच साज भक्तांनी चढवला होता. दीड दिवसांचे ११ सार्वजनिक, तर २४ हजार ८६१ खासगी बाप्पाच्या मूर्तींचे समुद्र, तलाव, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी तब्बल ९९ हजार ३६० गणेशमूर्तींचे जल्लोषात आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तिमय बनले आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये बाप्पाच्या उत्सवाचा चांगलाच उत्साह संचारलेला दिसत आहे.
गुरुवारी गणरायाच्या आगमनाने सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल, तर तो बच्चे कंपनीला झाल्याचे दिसत होते. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला त्यांनी कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. पूजा, आरती, प्रसाद, नाचगाणी, नवीन कपडे यामध्ये ते मस्तच तल्लीन झाल्याचे दिसत होते. गुरुवारचा अख्खा दिवस आणि रात्र त्यांनी चांगलीच मौजमजा केली. शुक्रवारी आपल्या दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्याची हुरहूर त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे त्यांचे मन सुन्न झाल्याचे दिसत होते; पंरतु पुढच्या वर्षी बाप्पाच्या पुनर्रागमनाची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. समुद्रकिनारे, तलाव, नदी अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
या वर्षी दीड दिवसाच्या बाप्पाची संख्या जास्त असल्याने सायंकाळी ५ नंतर बाप्पाला विसर्जन स्थळी नेण्यास सुरुवात झाली. टाळ, मृदुंगाचा गजर करीत, तर कोणी डीजेच्या तालावर धमाल मस्ती करत बाप्पाला निरोप दिला. त्या वेळी विविध ढोल-ताशा पथकांनी परिसर चांगलाच दणाणून सोडला होता. गाण्याच्या तालावर अबालवृद्धांनी चांगलाच ठेका धरला होता. महिलांनी पारंपरिक पद्धतीच्या साड्या परिधान करून, मिरवणुकीमध्ये मिरवण्याची हौस फिटवून घेतली. भगवे फेटे परिधान केलेले तरुण मंत्रमुग्ध होऊन नाचत होते.
बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अलिबागच्या समुद्रकिनारी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे समुद्रकिनाºयाला जत्रेचे स्वरूप आले होते. समुद्रकिनारी विविध खाद्य पदार्थांच्या स्टालवरही खवय्यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे भेळ, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, मसालाडोसा, फ्रँ की यांचे स्टाल चांगलेच बहरले होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनारी जाणारे मार्ग एक दिशेने केले होते. पोलिसांनी एन्ट्री पाइंटला बॅरिगेट्स लावल्याने अनावश्यक वाहनांना विसर्जन स्थळी जाण्यास मज्जाव केला होता.
समुद्रकिनारी अलिबाग नगरपरिषदेमार्फत मदतकेंद्र उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जीवरक्षकही किनारी तैनात केले होते. लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांना पाण्यात जाण्यापासून अडवण्यात येत होते. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेले विसर्जन रात्री १० वाजेपर्यंत सुरू होते.