मडके कारागीर, व्यावसायिकांना आले सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:47 AM2021-03-13T00:47:09+5:302021-03-13T00:47:27+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमती ३० ते ४० टक्क्यांनी वधारल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे फ्रीजपेक्षा मातीच्या मडक्यातील थंडगार पाण्याला अनेक जण पसंती देत आहेत. त्याचबरोबर पोपटी बनविण्यासाठी मडके हे प्रथम जिन्नस आहे. त्यामुळे सध्या मातीच्या मडक्यांना खूप मागणी आहे. परिणामी मडके बनविणाऱ्या कारागीर, विक्रेते व व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमती ३० ते ४० टक्क्यांनी वधारल्या आहेत.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. यंदा दिलासादायक स्थिती आहे. पोपटीसाठी मडक्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे व्यवसाय चांगला होत असल्याचे कारागीर नारायण कुंभार यांनी सांगितले. विविध आकार, रंग, पोत व किमतीची असलेली मडकी बाजारात उपलब्ध आहेत. लहान, मध्यम व मोठ्या आकारात मडके मिळते. त्याबरोबरच नळाचा कॉक लावलेले, झाकण असलेली, विविध रंगांनी नक्षीकाम केलेली मडकी देखील उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती, आकार आणि त्यावरील नक्षीकामावर ठरतात. खालून गोल असलेल्या मडक्यांसाठी स्टॅँडची गरज असते. हे स्टँड देखील सध्या ७०- ८० रुपयांत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.
कामगार खूश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परराज्यातून किंवा शहरातून मडके विक्रेते आले नसल्याने स्थानिक कारागीर व विक्रेत्यांच्या व्यवसाय तेजीत आली आहे.
मातीचे मडके आणि विविध वस्तूंना सध्या खूप मागणी आहे. माती सहज उपलब्ध होत नाही. परिणामी भाव वाढले आहेत; मात्र पोपटी व गार पाण्यासाठी मडके खरेदी वाढली आहे.
- शिल्पा कुंभार, विक्रेत्या, पाली
मडक्यांचे भाव २०२० २०२१
नळ असलेले मोठे २०० २५०
नळ लावलेले छोटे १२० १५० ते १८०
मोठे बिन नळवाले १५० २००
छोटे मडके १०० १५०