'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत दि.बा.पाटील विद्यालय अव्वल 

By वैभव गायकर | Published: February 21, 2024 06:54 PM2024-02-21T18:54:22+5:302024-02-21T18:54:39+5:30

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता. 

D.B.Patil Vidyalaya tops in Chief Minister My School Beautiful School competition | 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत दि.बा.पाटील विद्यालय अव्वल 

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत दि.बा.पाटील विद्यालय अव्वल 

पनवेल: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयाने तालुका स्तरावरती बाजी मारली असून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावरती विद्यालयाला यश मिळावे यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा राबविण्यात आली होती. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता. 

शिक्षण विभागाचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड,उपायुक्त गणेश शेटे व  प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन  यांच्या सूचनेनूसार लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयामधील अनुपमा अनिल डामरे, सरिता उमेश काकडे, विनिता रामदास तायडे, वैशाली संजय सावळे ,वैशाली  पाटील,चंद्रकांत लिंबाजी वारगुडे,अर्चना माने,नीलम देवळे,जयश्री रोडे  अशा सर्व शिक्षकांनी यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती.  या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील ,व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्यासाठी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने'च्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड करण्यात आली होती.

शैक्षणिक गुणवत्ता व वैयक्तिक विकासासाठी वाचन चळवळ सुरू करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धा,लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, शाळा सुशोभिकरण, इतर कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याचबरोबरीने विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन या उपक्रमांतर्गत आले होते. तंत्रस्नेही  शिक्षिका वैशाली संजय सावळे यांनी या सर्व उपक्रमांसाठी विशेष मेहनत घेतली आहे. 

पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदशनाखाली १२ कोटी रुपये खर्च करुन ही शाळा बांधण्यात आली आहे. याठिकाणी इयत्ता पहिली ते सातवी मराठी व इंग्रजी माध्यमाचे ज्युनिअर केजी व सिनीअर केजीचे वर्ग चालविले जातात. स्पर्धेच्या पुढील टप्प्यावर देखील विद्यालयाने यश मिळवावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत

Web Title: D.B.Patil Vidyalaya tops in Chief Minister My School Beautiful School competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.