मुरुड : समुद्रकिनारी विश्राम बागेसमोर ६५ किलो वजनाचा पाच फूट लांब असा डॉल्फिन रविवारी आढळून आला. सर्पमित्र संदीप घरत यांना हा डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्यावर त्यांनी वनविभागाला कळविले. खोल समुद्रात असलेल्या या माशाच्या तोंडाला मोठ्या जहाजाचा पंखा लागल्याने तो जबर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वन विभागाला याबाबत माहिती मिळताच वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के.आर.खांडेकर, किरण जाधव, एस.आर.वट्टमवार, खास मदतीसाठी संदीप घरत उपस्थित होते. या वेळी वन कर्मचाऱ्यांनी तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी विनायक पवार यांना शवविच्छेदनसाठी बोलवले; त्यांनी तातडीने समुद्र किनारी येऊन डॉल्फिन माशाचे शवविच्छेदन केले. तदनंतर वन कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनाºयापासून दूर खड्डा करून त्यास दफन के ले. वन्यजीव असल्याने वन खात्याने या प्रकरणात चांगले लक्ष घालून विविध सोपस्कार पूर्ण केले.