बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेनंतर बिरवाडीमधील नागरिकांनी संताप व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रामध्ये प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना कुंभारवाडा येथील नागरिक दीपक स्वाई यांच्या निदर्शनास आली. या घटनेमुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीवर अवलंबून पाणी योजनाही अडचणीत सापडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे बिरवाडी काळ नदीपात्रातील मासेमारी धोक्यात आल्याने आदिवासी भोई बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप किनारा कुंभारवाडा येथील कल्पेश उर्फ राजू लक्ष्मण पवार यांनी केला. या घटनेनंतर असनपोई ग्रामस्थ हनुमंत पवार यांनी पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बिरवाडीमधील नागरिक आक्रमक झाले.औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असल्याचा आरोप बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी केला आहे. वारंवार नदीपात्रात उद्भवणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
बिरवाडी येथे काळ नदीत मृत माशांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:31 AM