सिकंदर अनवारेदासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून नाल्यामध्ये मृत मासे दिसून येत आहेत. सातत्याने पडणाºया पावसामुळे औद्योगिक क्षेत्रातील नाले तुडुंब भरले आहेत. या पावसाचा आणि भरलेल्या नाल्याचा फायदा रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी केला जात असल्याने हे मासे मृत पावले असावेत असा प्राथमिक अंदाज प्रदूषण मंडळाने काढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाड आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गणेश विसर्जनानंतर हे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत. महाड एमआयडीसीमधील गटारांची देखील साफसफाई न झाल्याने गटारे देखील भरून वाहू लागली आहेत. याचा फायदा काही कंपन्यांनी घेतला असून रासायनिक सांडपाणी थेट या गटारात सोडण्यात येत आहे. शिवाय कंपनीच्या आवारातील पावडर, खाली पडणारे द्रवयुक्त रसायन देखील पावसाच्या पाण्याबरोबर कंपनीच्या बाहेर येवून गटाराला मिळत आहे. यामुळे गेली दोन दिवस महाड औद्योगिक परिसरात काही ठिकाणी गटारात मृत मासे आढळून येत आहेत. हे मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात आहेत. महाड एमआयडीसीमधील सी झोनमधील नाल्यात हे मासे आढळून आले आहेत. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच पावसाच्या पाण्यात सोडण्याचा प्रकार काही केल्या थांबत नसल्याने जलचर धोक्यात आले आहेत.
महाड एमआयडीसी यापूर्वीच प्रदूषणाच्या बाबतीत कायम चर्चेत राहिली आहे. मात्र, यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी आज देखील अनेक छोटे-मोठे कारखाने खर्च वाचवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात किंवा गटारात सोडण्याचे काम करत आहेत. याबाबत अनेक तक्रारी महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आल्या आहेत. महाड उपप्रादेशिक कार्यालय मात्र केवळ नोटिसी देण्याच्या कामाचे राहिले असल्याने आणि वरिष्ठ पातळीवर उपप्रादेशिक कार्यालयाकडून पाठवलेल्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जात असल्याने हे प्रकार सुरूच राहिले आहेत. महाड एमआयडीसीमधील रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, तरी देखील कंपन्यांच्या आवारात किंवा परिसरात सांडपाणी आढळून येत आहे.गेले काही दिवस पडणाºया पावसाचा फायदा महाड एमआयडीसीमधील छोट्या कंपन्यांनी घेतला असावा आणि यातूनच हे मासे मृत झाले असण्याची शक्यता महाड औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.गटारात मृत मासे असल्याची माहिती मिळताच पाहणी केली, शिवाय तेथील पाण्याचे नमुने घेतले; परंतु पावसाचे पाणी अधिक असल्याने पाण्यात रासायनिक अंश दिसून येत नाही. मात्र, पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी सोडल्याने हे मासे मृत पावले असावेत.- सा. वि. औटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ, महाड