पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा; पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:01 PM2019-08-09T23:01:50+5:302019-08-09T23:02:05+5:30

पनवेल येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Deal with flood damage early | पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा; पालकमंत्र्यांचे आदेश

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा; पालकमंत्र्यांचे आदेश

Next

अलिबाग : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच पूर आलेल्या भागांमध्ये साथीचे आजार पसरू नयेत याची आरोग्य यंत्रणेने दखल घ्यावी, अशा सूचना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. पनवेल येथील सरकारी विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टी व पूरपरिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी व सामाजिक संस्था यांना पाचारण करण्यात आले होते. सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्तीचे तसेच घरे, गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. मोठी लहान दुधाळ, ओढकाम करणारी जनावरे आदींचेही नुकसान झाले आहे. दरडग्रस्त भागातील पडलेली झाडे तत्काळ काढून तेथील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ते पूर्ववत करणे तसेच आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना प्रशासनाने तातडीची मदत दिली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना सरकारी नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार आहे. नुकसानीबाबतचे पंचनामे करून आर्थिक मदतीसाठी तसा प्रस्ताव सरकारकडे तत्काळ सादर करावा, असे त्यांनी सांगितले. आपत्ती प्रसंगी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, आर्मी व सामाजिक संस्था या सर्व यंत्रणांनी चांगले काम केल्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी आ.रविशेठ पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रेय नवले, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आदी उपस्थित होते.

Web Title: Deal with flood damage early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर