बिरवाडीत डम्पिंग ग्राउंडवर गुरांचा मृत्यू; शेतकऱ्यांनी गुरे मोकाट सोडू नयेत, पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:37 PM2020-02-04T23:37:43+5:302020-02-04T23:38:04+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत.
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या दोन दिवसांपासून गुरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अवसर मोल, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस कर्मचारी रवि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर पोलिसांनी, शेतकऱ्यांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन केले आहे.
कुंभारवाडा या ठिकाणी बिरवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीचे गुरचरण असून, याला लागूनच ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून गुरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी महाड एमआयडीसी पोलिसांना देताच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थ शेतकºयांनी आपली गुरे मोकाट सोडू नये, असे आवाहन केले आहे. तर आसनपोई येथील शेतकरी हनुमंत पवार यांनी गुरांचा होणारा मृत्यू हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतरही कचºयामध्ये प्लास्टिक येते कुठून? असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ व पशुवैद्यकीय अधिकाºयांना कळवून या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत
महाड एमआयडीसीमधील कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा रासायनिक सलज प्रक्रियेकरिता न पाठवता ते बिरवाडी ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडवर ओतल्याने चारा समजून जनावराने खाल्ल्याने जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या जनावरांचे शव अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळल्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप जीवन नागरी पर्यावरण संस्थेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक स्वाई यांनी या घटनेनंतर घेतला आहे.
ग्रामपंचायतीने कारवाई करावी
बिरवाडी परिसरातील शेतकºयांची गाय, बैल, म्हैस अशी जनावरे अनेक दिवसांपासून बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या गुरचरण शेजारी असणाºया डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडले. या घटनेची गंभीर दखल घेत बिरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लक्ष्मण पवार यांनी केली आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याने या ठिकाणी वायुप्रदूषण व जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.