सूरजचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू
By admin | Published: March 15, 2016 12:54 AM2016-03-15T00:54:11+5:302016-03-15T00:54:11+5:30
येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका नातेवाइकांसह ग्रामस्थांनी ठेवला.
अलिबाग : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान रविवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा ठपका नातेवाइकांसह ग्रामस्थांनी ठेवला. डॉक्टरांना तातडीने बेड्या ठोका, अशी मागणी करून सुमारे तीनशेच्या जमावाने तब्बल आठ तास आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला वेठीस धरले होते. सूरजच्या शवविच्छेदनाचा अहवाल जे. जे. रुग्णालयातून सायंकाळपर्यंत पोलिसांना उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी तीनही डॉक्टरांना ताब्यात घेतल्याचे अलिबाग पोलिसांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील सूरज पाटील (२३) याला मणक्याचा त्रास होता. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर साठ्ये हे त्याच्यावर उपचार करीत होते. रविवारी सूरजवरती शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई येथील तज्ञ डॉक्टारांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. साठ्ये, भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र घाटे या डॉक्टरांचा पथकामध्ये समावेश होता. शस्त्रक्रियेदरम्यान सूरजचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी ही माहिती नातेवाइकांना दिली नाही. काही कालावधीनंतर डॉक्टरांनी सूरजचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना रात्री नऊच्या सुमारास सांगितले. (प्रतिनिधी)
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सूरजचे सुमारे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. सूरजला एक अपत्यही आहे. सूरज गेल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी सायंकाळी सूरजचे शव त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास वराडे यांनी दिली.