कळंबोलीतील सिलिंडर स्फोटात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:46 AM2018-06-01T01:46:42+5:302018-06-01T01:46:42+5:30
कळंबोली सेक्टर ३ मधील एलआयजी वसाहतीमध्ये गुरुवारी पहाटे सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोहम कट्टे या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोली सेक्टर ३ मधील एलआयजी वसाहतीमध्ये गुरुवारी पहाटे सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोहम कट्टे या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटामुळे दोन घरांच्या भिंती पडल्या असून बाहेरील दोन वाहनांचेही नुकसान झाले आहे.
येथील एलआयजी कॉलनीत राहणाऱ्या नाना जाधव यांच्या घरामध्ये ही घटना घडली. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या पत्नी अश्विनी किचनमध्ये गेल्या. घरात गॅसगळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. गॅस पेटविण्यासाठी लायटर लावताच अचानक स्फोट झाला. यामध्ये अश्विनी यांचा चेहरा व हात भाजला आहे. त्यांचे पती नाना हेही जखमी झाले आहेत. स्फोटामुळे दोन घरांच्या मधील सामाईक भिंत पडली.
शेजारच्या घरात झोपलेला पाच वर्षांचा मुलगा सोहम कट्टे याच्या चेहºयावर दगड पडून तो जखमी झाला व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. सोहमचे वडील बबन व आई शुभांगी कट्टे हेही जखमी झाले आहेत. स्फोटानंतर उडालेल्या विटांमुळे रोडवर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ जीप व एक मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटानंतर परिसरातील नागरिकांनी मृत मुलगा व जखमींना तत्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले आहेत. कट्टे कुटुंबीय हे माण तालुक्यातील गोंदवले येथील मूळ निवासी आहेत. स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर कट्टे व जाधव यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी व रुग्णालयात गर्दी केली होती.
पहाटे झालेल्या स्फोटामुळे कळंबोलीसह पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली होती. नक्की कशाचा स्फोट झाला हे न समजल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही क्षणात घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली होती. दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते.