पनवेल: खारघर शहरात सेक्टर 15 वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजुस असलेल्या कांदळवणात (गोल्डन जॅकल) या प्रजातीच्या कोल्ह्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार दि.12 रोजी प्राणीमित्र सीमा टँक यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिल्यावर वनविभागाने हा मृतदेह कोल्ह्याचा असल्याचा शिक्कामोर्तब केला. वनविभागाचे अधिकारी डी एस सोनावणे यांच्या मार्गदर्शनात यावेळी वनरक्षण महेश चन्नागिरे, जगदीश राक्षे, वनपाल अशोक घुगे आदी वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी या मृतदेहाची पाहणी केली.
या कोल्ह्याच्या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. या कोल्ह्याची केवळ शेपटीचा शिल्लक असल्याचे दिसून आले.या कोल्ह्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.पनवेल पंचायत समितीचे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. मृत कोल्हा 4 ते 5 वयोवर्षाचा असावा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.खारघर मधील याठिकाणच्या कांदळवणाच्या जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यानेच असे प्रकार घडत आहे.ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडला त्याच परिसरास गोल्डन जॅकल प्रजातीचा कोल्हा प्राणीमित्र सीमा टँक यांना दिसून आला आहे. सिडको, पनवेल महानगर पालिका तसेच वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी टँक यांनी केली आहे.