कर्जत : दिवाळीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठ फुल्ल झाली होती. विशेष म्हणजे, शुक्रवारचा बाजार असल्यानेही गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती. वसुबारस व धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीची सुरुवात. मात्र, गुरुवारपर्यंत निवडणुकीचे वातावरण होते. निवडणूक संपली आणि निकालही जाहीर झाला, कोणाचा जय तर कोणाचा पराजय झाला. त्यामुळे कार्यकर्ते दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आता सज्ज झाल्याचे दिसत आहे.
निवडणूक प्रचारात बिझी असलेले कार्यकर्ते आज कर्जत शहराच्या बाजारपेठेत खरेदीसाठी दिसत होते, त्यात शुक्रवारचा बाजार असल्याने कर्जतची बाजारपेठ फुल्ल दिसत होती. कपडे, फटके , किराणा दुकानात दिवसभर गर्दी असल्याचे पाहवयास मिळाले. ढगाळ वातावरण आणि त्यात मध्येच रिमझिम पडणारा पाऊस याचा कोणताच परिणाम बाजारातील गर्दीवर झालेला दिसून आला नाही.
पावसाचे सावट असूनही पेणच्या बाजारपेठेत गर्दी
पेण : निवडणूक निकाल लागल्यानंतर आता दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळत आहेत. शुक्रवार धनत्रयोदशीस जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर के ल्याने सलग तीन दिवस सुट्टी पडल्याने पेण बाजारात ग्राहक दिवाळी खरेदीसाठी दाखल झाले आहेत. शिवशाहीचे गडकोट, तयार किल्ले खरेदीसाठी बच्चेकंपनीला बाजाराची ओढ लागली आहे.
शिवकाळाचे साक्षीदार असणाºया या किल्ल्यांना दिवाळीत मोठी मागणी असते. यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचे, मातीचे किल्ले बाजारात दाखल झाले आहेत. या किल्ल्यांच्या खरेदीसाठी बच्चेकंपनी पालकांसह बाजारात व गणेशमूर्ती चित्र शाळेत दिसत आहेत. १५०, २००, ३०० व ५०० रुपयांपर्यंत किल्ल्यांच्या किमती आहेत. तर शिवाजी महाराजांच्या मूर्ती ५०, १००,२ ००,२५० रुपयांपयत उपलब्ध आहेत.
मावळे, पशूपक्षी प्रत्येकी १० रुपये प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पेणच्या बाजारात व मूर्तिकारांच्या चित्रशाळेत हे सर्व विक्रीसाठी ठेवले आहेत. रंगबिरंगी आकाशकंदील लक्ष वेधत आहेत. पेण नगरपरिषद मैदानावर २९ फटाक्यांची दुकाने लागली आहेत; मात्र पावसामुळे फटाके खरेदीसाठी गर्दी दिसत नाही. रविवारपासून खरेदीला प्रतिसाद मिळेल असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.