भाडेवाढ स्थगितीचा निर्णय लवकरच घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:41 AM2020-10-08T00:41:05+5:302020-10-08T00:41:14+5:30
जेएनपीटी बंदर वसाहतीचा प्रश्न; बोर्ड ऑफ ट्रस्टची मंजुरी आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत
उरण : जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील रहिवासी आणि वाणिज्य संकुलाच्या दुपटीने केलेल्या भाडेवाढीचा प्रस्ताव येत्या ट्रस्टीच्या बैठकीतच मांडला जाईल. ट्रस्टीच्या बैठकीत मंजुरीनंतरच स्थगितीबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे यांनी दिली.
जेएनपीटी बंदर प्रशासनाने कामगार वसाहतींमधील रहिवासी आणि वाणिज्य संकुलाच्या भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. जुलै महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरमसाट भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होरपळून जाणाºया वसाहतीमधील रहिवाशांसह काही कामगार संघटनांनीही अचानक दुपटीने करण्यात आलेली भाडेवाढ रद्द करण्याची मागणी जेएनपीटी बंदर प्रशासनाकडे केली होती.
भाडेवाढ रद्द करण्यासाठी रहिवासी, व्यापारांनी उरणचे आमदार महेश बालदी यांचीही भेट घेऊन मागणी केली होती. या मागणीनंतर बालदी यांनी भाडेवाढी संदर्भात केंद्रीय मंत्री, तसेच जेएनपीटी बंदराचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याबरोबर चर्चा करून भाडेवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी (६) वसाहतीमधील रहिवाशांची शिष्टमंडळाने जेएनपीटी बंदराच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयंत ढवळे, मनिषा जाधव, शिष्टमंडळातील गणेश ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सूरज पवार, गिरीष म्हात्रे, सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू उपस्थित होते. यावेळी अधिकारी शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
जेएनपीटी प्रशासनाकडून ३१ मार्च, २०२१ पर्यंत भाडेवाढीला स्थगिती देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या ट्रस्टीच्या बैठकीत मांडला जाईल. ट्रस्टीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच स्थगितीबाबत अंतिम निर्णय होईल.
-जयंत ढवळे, वरिष्ठ प्रबंधक, सेक्रेटरी, जेएनपीटी