अपघातानंतर एनएमएमटी बसेसची कोप्रोली मार्गावरील प्रवासी वाहतूक बंदचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:29 PM2024-02-09T18:29:33+5:302024-02-09T18:33:07+5:30

एनएमएमटी बसने गुरुवारी सकाळीच खोपटा येथील रस्त्यावरील टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली होती.

Decision to stop passenger traffic of NMMT buses on Koproli route after the accident | अपघातानंतर एनएमएमटी बसेसची कोप्रोली मार्गावरील प्रवासी वाहतूक बंदचा निर्णय

अपघातानंतर एनएमएमटी बसेसची कोप्रोली मार्गावरील प्रवासी वाहतूक बंदचा निर्णय

मधुकर ठाकूर 

उरण  : खोपटा येथील गुरुवारी झालेल्या  एनएमएमटी बसच्या अपघातानंतर कर्मचाऱ्यांना  जमावाने घटनास्थळीच अडवून ठेवल्याने या मार्गावरील  प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे आज दिवसभरात एकही बस या मार्गावर धावली नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

एनएमएमटी बसने गुरुवारी (८) सकाळीच खोपटा येथील रस्त्यावरील टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली होती. याअपघातात खोपटा येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाला होता.तर एकजण गंभीररीत्या जखमी झाला होता.यामुळे संतप्त झालेल्या जमावाने व ग्रामस्थांनी एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना  वेठीस धरून दिवसभर रास्ता रोको आंदोलन केले होते. या रास्तारोको दरम्यान एनएमएमटीच्या अनेक बसेसही रस्त्यावर अडकून पडलेल्या होत्या.

या प्रकाराचा निषेध करुन एनएमएमटीच्या संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तुर्भे डेपोत शुक्रवारी जोरदार आंदोलन केले.अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात . कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत. सुरक्षितेचीही हमी नाही.या सुरक्षिततेच्या संबंधित विविध मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.तसेच सर्वच प्रवासी मार्गांवर  एनएमएमटीच्या बसेस बंद करण्याचा निर्धारही कर्मचाऱ्यांनी घेतला होता.मात्र प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कोप्रोली वगळता इतर  मार्गावरील बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे उरण-कोप्रोली या मार्गावर प्रवासी बसेस बंद करण्यात आल्या असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाचे व्यवस्थापक योगेश केडुस्कर यांनी दिली.

एनएमएमटीच्या कोप्रोली मार्गावर दररोज १२ बसेसच्या ५२ फेऱ्या होतात.या मार्गावरील बससेवा तोट्यात असतानाही सामान्य नागरिकांना प्रवासी सेवा देण्यासाठी एनएमएमटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.मात्र कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे शुक्रवारपासून (९) या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक योगेश केडुस्कर यांनी दिली. यामुळे आज दिवसभरात एकही बस या मार्गावर धावली नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

Web Title: Decision to stop passenger traffic of NMMT buses on Koproli route after the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.