आंब्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढले; डझनाला मोजावे लागतात १००० ते १५०० रु.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 11:47 PM2021-04-30T23:47:28+5:302021-04-30T23:47:42+5:30
डझनाला मोजावे लागतात १००० ते १५०० रु.
गिरीश गोरेगावकर
माणगाव : एप्रिल महिना संपला तरी बाजारात हापूस आंबा म्हणावा तसा आला नाही. थोड्या प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या हापूसच्या डझनाचा भाव १००० ते १५०० रुपये आहे. बदलते हवामान व अवकाळी पावसाचा फटका आंबा व इतर फळपिकांना बसला आहे. ऐन मोहोर प्रक्रिया सुरू असताना अवकाळी पावसामुळे फळधारणा झाली नाही.
रानमेव्याचे माहेरघर असलेल्या माणगाव तालुक्यात यावर्षी हापूस व रायवळ आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात अनेक बागा व कलम उन्मळून पडल्याने हापूस व इतर आंब्याचे उत्पादन ६० ते ७० टक्के कमी होणार आहे. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेला हापूस हा देवगडचा असला तरी तो वाशी मार्केटमधून आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उत्पादन कमी असल्याने यावर्षी हापूस आंबा डझनाला १००० रुपये व अधिक किमतीला मिळत आहे.
गे
ल्यावर्षी ५०० ते ६०० रुपये डझन असलेला आंबे यावर्षी महाग झाल्याने सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव अजून चाखता आली नाही. आवक वाढेल तशी किमती कमी होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.आंबे विक्री करणाऱ्या पाणोसे येथील शेतकरी शंकर मांडवकर यांना सांगितले की, सुरुवातीला आंब्याना चांगला मोहोर आला होता. मात्र, डिसेंबर महिन्यात पडलेल्या पाऊस धुरक्यामुळे सगळा मोहोर गळून गेला. त्यामुळे रानात अगदी तुरळक आंबा दिसत आहे. दरवर्षी पाच ते दहा हजार उत्पन्न देणारे हे फळ न आल्याने नुकसान झाले आहे.