मूर्तिकारांची घटती संख्या चिंतेची बाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:55 AM2017-08-01T02:55:54+5:302017-08-01T02:55:54+5:30
तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. तरुण पिढीने ती अंगीकारून पुढे चालविली आहे.
रोहा : तालुक्यातील गावोगावी पारंपरिक मूर्तिकारांनी वडीलधाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कलाकुसर जतन केली आहे. तरुण पिढीने ती अंगीकारून पुढे चालविली आहे. पेण नगरीप्रमाणे रोहा शहर आणि ग्रामीण भागात हा व्यवसाय वर्षाचे बारा महिने सुरू राहात नाही. केवळ काही महिन्यांपुरताच मूर्तिकारी व्यवसाय मर्यादित राहात असल्याने इतर वेळी नोकरी व कामासाठी गावाबाहेर जावे लागते. परिणामी मूर्तिकारांची दिवसेंदिवस घटणारी संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे समोर आले आहे.
रोहा शहरातील अष्टमी, दमखाडी, धनगर आळी आणि सोनार आळीत तसेच सोनगाव, उडदवणे, सानेगाव, यशवंतखार, महादेवखार, चांडगाव, चणेरा, बुरूमखान, वरसे कोलाड, किल्ला आदी तालुक्यातील गावात आजही मूर्तिकार शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती घडविताना दिसून येतात. मूर्तिकारी व्यवसायाला वर्षाचे बारा महिने हाताला काम नसल्याने या मूर्तिकारांचा हिरमोड होतो, त्यातच महागाईबरोबर वाढलेल्या शाडूच्या मातीचे आणि रंगांच्या दरांमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मजुरीच्या दरात जरी काही प्रमाणात वाढ झाली असली तरी मूर्तिकारांना त्याच्या कलेचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे मूर्तिकार सांगतात.
रोहा शहर व तालुक्यात साधारण ७५ ते ८० मूर्तिकार व तेवढेच रंगकाम करणारे आहेत. लहान मोठ्या मिळून साधारण दोन हजार मूर्ती दरवर्षी येथे घडविल्या जातात. यातील पाच ते दहा टक्के मूर्ती विक्र ी न होता शिल्लकही राहात असल्याचे सांगण्यात आले. या व्यवसायातून तालुक्यात ५५ लाख रुपयांची उलाढाल होत असते.