नेरळ : कर्जतमधील एक दीप शहिदांचा ग्रुप आणि क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धगडावर दिवाळीत दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षीही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. शेकडो पणत्या लावून रविवारी मध्यरात्री १२ वाजता पणत्या प्रज्वलित करून वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुेण आणि मान्यवर उपस्थित होते.
सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना सिद्धगडावर वीरगती प्राप्त झाली. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीरभाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील, तसेच क्रांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेऊन हा उपक्रम राबविण्यात येतो. सिद्धगड या पवित्र वीरभूमी येथे दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर, देवपाडा आणि मुरबाड येथील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या वर्षी या सर्वांच्या सहभागाने संपूर्ण परिसर रोषणाईने उजळला होता. व्यर्थ न हो बलिदान आणि आझाद दस्ता अमर रहे अशा पणत्या ठेऊन प्रज्वलित केल्या होत्या. दोन दिवस अगोदर तरुणांनी या जागेची साफसफाईदेखील केली होती. यंदाचे हे पाचवे वर्ष असल्याने अनेक तरुण सिद्धगडावर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांविषयी कृतज्ञात व्यक्त केली. यावेळी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीचे उपसभापती दीपक खाटेघरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष महेंद्र पवार, क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भगत, शिवराम बदे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.