कॅन्सरवर मात करून डायलेसिस रुग्णांची सेवा, दीपाली वैभव देशमुख यांना ‘लोकमत स्त्रीशक्ती गौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:10 AM2017-09-26T04:10:11+5:302017-09-26T04:10:15+5:30
शासकीय आरोग्य सेवेबद्दल सर्वत्र नकारघंटा वाजत असताना रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिटमध्ये डायलेसिसकरिता येणारे रुग्ण मात्र धन्यवाद देत असतात.
अलिबाग : शासकीय आरोग्य सेवेबद्दल सर्वत्र नकारघंटा वाजत असताना रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिटमध्ये डायलेसिसकरिता येणारे रुग्ण मात्र धन्यवाद देत असतात. १० आॅगस्ट २००९ रोजी रायगड जिल्हा रुग्णालयात एका डायलेसिस मशिनच्या माध्यमातून प्रथम डायलेसिस सेवा सुरू झाली आणि या पहिल्या दिवसापासून या डायलेसिस युनिटची आजतागायत जबाबदारी डॉ.दीपाली वैभव देशमुख या सांभाळत आहेत. गतवर्षी त्यांना स्वत:ला कॅन्सरसारख्या गंभीर व्याधीला सामोरे जावे लागले. आपल्या स्वत:वरील आठ महिन्यांंच्या उपचारादरम्यान त्यांना स्वत:ला मात्र येथे डायलेसिसच्या रुग्णांचे काय होत असेल याचीच चिंता सतावत होती. आठ महिन्यांच्या उपचारांती स्वत: जिद्दीने उभ्या राहिलेल्या डॉ.दीपाली देशमुख यांनी पुन्हा या डायलेसिस युनिटची जबाबदारी स्वीकारुन ती त्या समर्थपणे सांभाळत आहेत. याच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य सेवेची विशेष दखल घेवून सोमवारी नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या डायलेसिस वॉर्ड या डॉ.देशमुख यांच्या कार्यस्थळीच पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ.देशमुख म्हणाल्या, १० आॅगस्ट २००९ रोजी डायलेसिस सेवा सुरू झाली. त्यापूर्वी जिल्ह्यातील डायलेसिस गरजू रुग्णांना पनवेल, मुंबई वा पुणे येथे जावे लागत असे आणि हा प्रवास त्यांच्याकरिता जीवावरचाच असे. सद्यस्थितीत येथे चार डायलेसिस मशिन्स आहेत. गेल्या आठ वर्षांत या सरकारी डायलेसिस युनिटच्या माध्यमातून केवळ २२० रुपये सरकारी माफक शुल्कात १ हजार ५९७ रुग्णांना ११ हजार ९९२ वेळा डायलेसिसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले. सकाळी ७ ते रात्री ११ अशा वेळेतील चार शिफ्टमध्ये येथे रुग्णांना डायलेसिस सेवा उपलब्ध करुन दिली जात असतानाही, अद्याप १६ डायलेसिस रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांना डायलेसिस सेवा उपलब्ध करुन देता येत नसल्याची खंत डॉ.देशमुख यांनी सांगितली. त्यावर आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुन पाचवे डायलेसिस मशिन लवकरच येथे उपलब्ध करुन देण्याचे सूतोवाच चित्रलेखा पाटील यांनी यावेळी केले. लोकमतच्या या उपक्रमाचे स्वागत करुन, अशा उपक्रमाच्या माध्यमातून प्रामाणिक सेवा करणाºया डॉक्टरांच्या कौतुकाबरोबरच सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी अखेरीस नमूद केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या समन्वयक डॉ.भक्ती फाफळे-पाटील, रुग्णालयाच्या मेट्रन जयश्री मोरे, डॉ.देशमुख यांच्या युनिटमधील सहकारी नम्रता नाईक, निकिता थळे,प्रज्ञा चोगले, तंत्रज्ञ अतुल पवार, महेश म्हात्रे आदि सर्व आवर्जून उपस्थित होते.
हा गौरव
सर्व सहकाºयांचा
डायलेसिस रुग्णसेवा करीत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु माझ्यासह येथील माझ्या सर्व सहकाºयांनी त्यावर मात करुन अखंड रुग्ण सेवा देण्यात यश मिळवले.
या साºया प्रवासात आज माझा ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ प्रदान करुन सन्मान के ला, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही तर माझ्या सर्व सहकाºयांचा आहे.
आम्हा सर्वांना याचा मोठा आनंद आहे अशी भावना डॉ.दीपाली देशमुख यांनी व्यक्त केली आहे.