पनवेल : पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण पहिल्या पावसातच ओव्हर फ्लो झाले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने धरण रात्री ३ च्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. धरणातील पाण्याने मे मध्येच तळ गाठला होता. तेव्हापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, देहरंग धरण पूर्णपणे भरल्याने शहरवासीयांची पाण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे.पनवेल शहराला इमेजीपी, एमआयडीसी तसेच देहरंग धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या तीन स्रोतांपैकी देहरंग धरण पालिकेच्या मालकीचे आहे. पहिल्या दिवशी धरण भरले असून ८९.१५ पाण्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे काही दिवसांतच शहरातील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील नागरिकांचे मागील दोन महिन्यांपासून पाण्याअभावी प्रचंड हाल सुरू आहेत. शहरात पाण्याची समस्या उद्भवली असल्यापासून टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. चढ्या दराने पाणी विकण्याचा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू आहे.धरण ओव्हर फ्लो झाले असून, लवकरच शहरात पूर्ण वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.- उल्हास वाड, प्रभारी अधिकारी,पाणीपुरवठा विभाग,पनवेल महापालिका
देहरंग धरण ओव्हर फ्लो; पनवेलकरांची पाणीसमस्या दूर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:41 AM