सावित्रीच्या लेकींची तहसीलवर धडक; डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:45 PM2019-01-04T23:45:52+5:302019-01-04T23:46:02+5:30
शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.
- जयंत धुळप
अलिबाग : नवरा वीटभट्टीवर दुसऱ्या राज्यात मेला आहे. त्याच्या मृत्यूचा दाखला नाही, तर म्हातारीचे वय ६५, परंतु आधार कार्डवर दिसते ३३ वर्षे, दोन वेळच्या जेवणासाठी वणवण परंतु दारिद्र्यरेषेखालील यादीत नावाची नोंद नाही, पेणच्या ग्रामीण रुग्णालयात वयाचा दाखला मागायला गेले तर वैद्यकीय अधिकारी केवळ आधारकार्डवर नोंद केलेल्या वयानुसार दाखला देतात, ही सर्व कागदपत्रे गोळा करून पेन्शन योजना मंजुरीसाठी आली तर दरमहा रक्कम फक्त सहाशे रुपये, ही चेष्टा नाहीतर दुसरे काय, असा प्रश्न गुरुवारी सावित्रीबाई फुले जयंती दिनी पेणमधील एकल महिलांनी ‘मी पण’ अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केला आहे.
अंकुर ट्रस्ट व लोकमंच संघटनेच्या माध्यमातून गुरुवारी महिला अत्याचार विरोधी मंचाच्या ‘मी पण’ अभियानातर्फे पेण तालुक्यातील आदिवासी, विधवा, परित्यक्ता महिलांना संघटित करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजातील वंचित महिलांनी तहसीलदार कचेरीत धडक दिली. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पेण तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राजश्री साळवी, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.
लोकमंच संघटनेच्या माध्यमातून अनेक विधवा महिलांचे पेन्शन योजनेकरिता अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी महिलांना नायब तहसीलदारांनी योजनेविषयी माहिती दिली. यानिमित्ताने बोलताना डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या, विधवा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली ठरेल. या वेळी मंचाच्या शीला धामणकर, मोहिनी गोरे, वैजयंती नाईक, गणेश वाघमारे उपस्थित होते. शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीनंतर संजय गांधी योजना कार्यालयात महिलांना बसवून त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात आली.