अलिबाग : विधानसभा निवडणुकीसाठी अचारसंहिता जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे दोन हजार ४२७ होर्डिंग्स आणि बॅनर तातडीने उतरविले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.गल्लोगल्ली असणारे नेते, कार्यकर्ते यांचे होर्डिंग्स, पोस्टर आणि बॅनरने शहराचे नेहमीच विद्रुपीकरण करत होत असते. आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश बॅनर, होर्डिंग्स हटविण्यात आले आहेत. अचारसंहिता जाहीर होताच, विविध पक्षांचे झेंडे, एक हजाराहून अधिक बोर्ड, रस्त्यांवरील पथदिव्यांच्या खांबांना लावलेले ३०० हून अधिक बॅनर आणि होर्डिंग्स उतरविले आहेत. महामार्ग, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिराती दिसून येतात. धार्मिक, व्यवसायिक जाहिरातीही झळकत असल्या, तरी त्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती मोठ्या संख्येने लावल्याचे दिसून यायचे. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकही मागे राहिलेले नव्हते. त्यामुळे सरसकट सर्वच बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यातील शहर भागातील सुमारे एक हजार २०० तर ग्रामीण भागातील ९४५ असे एकूण दोन हजार ४८ अनधिकृत होर्डिंग्सवर जिल्हा प्रशासनाने बडगा उगारला आहे. सरकारी संपत्तीचे विद्रुपीकरण, सरकारी संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कटआउट, होर्डिंग्स, बॅनर, झेंडे आदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर २४ तासांमध्ये काढून टाकण्याबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे, तर सरकारी संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर, सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, रेल्वे पूल, रस्ते, एसटी बस, इलेक्ट्रिक/ टेलिफोन, खांब, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती ४८ तासांत काढून टाकण्याची कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट केले.रसायनीत आचारसंहिता लागू होताच काढले बॅनररसायनी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे वाढदिवस, अभिनंदन, स्वागत, निवड आदी संबंधीचे बॅनर संबंधितांनी त्याच दिवशी काढले. मोहोपाडा नाका, मच्छी मार्केट, नवीन पोसरी मार्ग, जनता विद्यालय मार्ग, स्टेट बँक चौक, पराडा कॉर्नर, चांभार्ली नाका आदी ठिकाणांचे बॅनर हटविले गेले आहेत. सेल्फी पॉइंटप्रमाणे गावातील महत्त्वाच्या इमारती, चौक, मार्ग, शाळा-कॉलेजकडे जाणारे रस्ते, रिक्षा थांबे आदी ठिकाणेचे बॅनर काढल्याने आता नेहमीच बॅनर लागून असलेल्या जागी चौकटी दिसू लागल्या आहेत.
जिल्ह्यातील दोन हजार ४२७ होर्डिंग्स हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 2:24 AM