माथेरानमधील पेमास्टर उद्यानाची दुरवस्था, गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:06 AM2018-03-13T03:06:25+5:302018-03-13T03:06:25+5:30
नैसर्गिक देणगी लाभलेले माथेरानमधील सर्वात उंच स्थानी अर्थातच समुद्रसपाटीपासून जवळपास ८२७ मीटर उंचीवर विराजमान झालेले पेमास्टर उद्यान सर्वांनाच नेहमी भुरळ घालत असते.
मुकुंद रांजणे
माथेरान : नैसर्गिक देणगी लाभलेले माथेरानमधील सर्वात उंच स्थानी अर्थातच समुद्रसपाटीपासून जवळपास ८२७ मीटर उंचीवर विराजमान झालेले पेमास्टर उद्यान सर्वांनाच नेहमी भुरळ घालत असते. मात्र या ब्रिटिशकालीन उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पेमास्टर उद्यानाला गतवैभव प्राप्त व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत आहे.
काही वर्षांपासून पेमास्टर उद्यान आणि बाजारपेठेच्या ठिकाणी असलेले नौरोजी उद्यानाची ठेकेदारामार्फत देखभाल करून घेतली जात आहे. त्यामुळे काहीअंशी ही उद्याने सुस्थितीत आहेत,परंतु झाडे वेलींनी बहरलेली नाहीत. फुलांची रोपे अल्प प्रमाणातच आहेत. रस्ते खडबडीत झालेले दिसत आहेत. बसण्याची आसन व्यवस्था कुचकामी ठरत आहे. झोपाळ्यांना गंज चढलेला असून काही झोपाळे बंद आहेत. माहिती फलक सुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीत. घसरगुंडी तसेच अन्य खेळांचे साहित्य भंगारात जाण्यायोग्यच आहे. पेमास्टर उद्यान हे माथेरानची शान आहे. या उद्यानाच्या चोहोबाजूला अनेक हॉटेल्स असून या उद्यानातील मार्गातून पर्यटकांची नित्याचीच वर्दळ पहावयास मिळते. क्षणभर विश्रांतीसाठी या उद्यानांची सुयोग्य पद्धतीने जोपासना होणे नितांत गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात केव्हाही इतिहासजमा होतील अशीच भीती स्थानिक मंडळींना तसेच पर्यटकांना होत आहे.
देशातील बहुतांश स्थावर मालमत्ता या ब्रिटिशकालीन आहेत. मात्र या मालमत्तेची देखभाल नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
>आम्ही लहानपणापासूनच माथेरानला नियमितपणे येत आहोत. त्यावेळेस आठ ते दहा दिवसांचा मुक्कामी दौरा होत असे. त्यावेळेस हे गाव अत्यंत सुंदर आणि थंड हवेने परिपूर्ण व्यापलेले असायचे. पेमास्टर उद्यानात दररोज सायंकाळी फेरफटका मारायचो. पूर्वीची ती सुंदरता सध्या येथे दिसत नाही. पर्यटकांकडून पन्नास रु पये प्रवासी कर घेतला जातोय, त्यांच्या पैशांचे काहीतरी चीज व्हायलाच हवे तरच येथे आणखी पर्यटक वाढतील आणि सगळ्यांना चांगला रोजगार उत्पन्न मिळेल.
- निशिकांत देसाई, पर्यटक मुंबई