भावना दुखावणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: March 27, 2016 02:19 AM2016-03-27T02:19:21+5:302016-03-27T02:19:21+5:30
चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या दरम्यानच चवदार तळ्याचे ब्राह्मणांकडून विधिवत जलपूजा करून तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा
महाड : चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या दरम्यानच चवदार तळ्याचे ब्राह्मणांकडून विधिवत जलपूजा करून तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी २९ मार्चला महाडमध्ये आंबेडकरी जनतेची निषेध सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे आयोजित केलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त १९ मार्चला ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाण्याचे ब्राह्मणांकडून जलपूजन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाडमधील सर्व दलित संघटना एकत्रित आल्या असून, या जलपूजनाच्या घटनेबाबत आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे खांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आ. भरत गोगावले यांना चवदार तळ्याचा इतिहास ज्ञात असतानाही आ. गोगावले यांनी हे जलपूजन ब्राह्मणांकडून कसे करून घेतले, असा सवाल खांबे यांनी यावेळी केला. दलित जनतेच्या यामुळे भावना दुखावणार होत्या याची कल्पना त्यांना असताना वास्तविक आ. गोगावले यांनी त्या जलपूजेला आक्षेप घ्यायला हवा होता, मात्र त्यांनी तो घेतला नाही.
चवदार तळ्याचे पाणी एखाद्या कलशात भरून ते जलसंपदा विभागाच्या कार्यक्रमात नेऊन त्याचे जलपूजन केले गेले असते तर एक चांगला संदेश गेला असता, मात्र हा प्रकार जाणीवपूर्वक केला गेल्याचा आरोप मोहन खांबे यांनी पत्रकार परिषदेत केला असून, केवळ दलित जनतेच्या भावना दुखावण्यासाठीच हे जलपूजन केल्याचे खांबे यांनी सांगितले.
२९ मार्चला या घटनेच्या निषेधार्थ चवदार तळ्याच्या प्रांगणात भव्य निषेध सभा घेण्यात येणार असून, सभेनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मोहन खांबे यांनी यावेळी दिली.