लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा प्रवासाचा त्रास कमी होण्यासाठी आणि गावातील विद्यार्थी वेळेत घरी यावे, यासाठी महाड तालुक्यातील आदिसते गावासाठी जाणाऱ्या एसटी गाडीच्या वेळापत्रक आणि मार्ग बदलण्याची मागणी आदिसते ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसभेतील ठरावाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील आदिसते हे गाव दुर्गम गावाच्या यादीतील गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेल्या या गावासाठी महाड आगारातून एकच बस जाते. ही बस आंबिवली, मुमुर्शी, पिंपळकोंड ही गाव करत पुढे आदिसत्याला जाते. एसटीच्या या मार्गामुळे या गाडीचा फायदा येथील विद्यार्थ्यांनाही होत नाही. जवळपास ८० विद्यार्थी या गाडीवर अवलंबून असतात. या एसटीने प्रवास करायचा म्हटला तर विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना विनाकारण वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे आदिसते गावात जाणारी एसटी गाडी असली तरी तिचा कोणताच फायदा येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना होत नाही. यासाठी महाड ते आदिसते अशी थेट एसटी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.३१ मे रोजी आदिसते ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत एसटीचे वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यासंबंधी तक्रार अरविंद जाधव या ग्रामस्थाने के ली होती, हा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एसटीचे वेळापत्रक आणि मार्ग बदलण्यास ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याची जाणीव करून देत ही मागणी केली आहे. मार्ग बदललेल्या या गाडीमुळे रोहन, विठ्ठलवाडी, वळंग बौद्धवाडी, खैरे सुतारे कोंड आदि गावातील विद्यार्थी, ग्रामस्थांना फायदा होणार आहे. नव्याने सुरू होणारी ही गाडी सकाळी ९.३० वाजता आणि संध्याकाळी ४.३० वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी देखील या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.चुकीच्या मार्गामुळे पायपीटआदिसते गावाला जाणारी एसटी गाडी आंबिवली, मुमुर्शी, पिंपळकोंड, मार्गे आदिसत्याला जाते. या मार्गामुळे अनेक ग्रामस्थ आणि विद्यार्थी तुडील फाट्यावर गाडीतून खाली उतरतात. महाडला येणाऱ्यांना इतर कोणत्याही वाहनाचा आधार मिळतो. मात्र आदिसते गावाला जाणाऱ्यांना या गाडीची वाट बघत तासन्तास तुडील फाटा येथे तिष्ठत बसावे लागते. अनेकदा गाडी न आल्याने रस्त्यात अडकून पडलेल्या या प्रवाशांना पायपिटीचा त्रास सहन करावा लागतो.
विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी एसटीचा मार्ग बदलण्याची मागणी
By admin | Published: June 15, 2017 2:44 AM