महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:06 AM2018-06-28T02:06:30+5:302018-06-28T02:06:38+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते.

The demand for completion of highway work | महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

Next

बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी लांबीमधील पहिल्या टप्प्याचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी प्रकल्पाची किंमत ९४२.६९ कोटीचा करारनामा २९ जानेवारी २0११ रोजी झाला होता. त्यानुसार १३ जून २0१४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे होते. आज २०१८ साल उजाडले, मात्र काम काही पूर्ण झाले नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. भरत गोगावले यांनी नमूद केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे व रस्त्याच्या डागडुजीचे काम गणेशोत्सवापूर्वी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या टप्प्यामधील पळस्पे ते वडखळमधील काम सुप्रीम कंपनीकडून काढून ते जे.एम. म्हात्रे कंपनीला देण्यात आल्याने या पहिल्या टप्प्यातील कामाची प्रगती आहे. मात्र वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. पुलाची कामे अर्धवट अवस्थेत तर आहेतच पण १ किमी देखील रस्ता व्यवस्थित नाही. वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज वाहतूककोंडी व अपघाताचे सत्र चालूच आहेत.
राष्ट्रीय महामार्गाची डागडुजी पावसाळ्यापूर्वी न केल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गोगावले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ मधील वडखळ ते इंदापूर या रस्त्याच्या दुरवस्थेला (एन.एच.ए.आय.) नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया हेच जबाबदार आहेत असा आक्षेप घेवून वडखळ ते इंदापूरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याचे सांगितले. ४ वर्षांपासून डोंगरातील माती रस्त्यावर वाहून येणे, पावसाळ्यात रस्त्यात गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात असे नमूद करून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली का? असेही म्हटले आहे. रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या प्राधिकरणाला निर्देश द्यावे अशी मागणी आ. गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

Web Title: The demand for completion of highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.