मृत्यूच्या चौकशीची मागणी
By admin | Published: December 16, 2015 12:54 AM2015-12-16T00:54:22+5:302015-12-16T00:54:22+5:30
येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने
खोपोली : येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी खोपोलीतील हे दोन तरुण आपल्या तीन मैत्रिणींसह मुंबईला गेले होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह मुंबईत वेगवेगळ्या रेल्वे स्थानकात आढळले, तर यांच्या सोबत असणाऱ्या अन्य तिघांचा ठावठिकाणा लागला नसल्याने मृत तरु णांच्या नातेवाइकांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
खोपोलीतील वासरंग परिसरात राहणारा निहाल गौतम शिंदे याचा ७ डिसेंबरला वाढदिवस होता. निहाल आपला मित्र दीपेश वाघेला व तीन मैत्रिणींसह वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत गेला होता. ८ डिसेंबरला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी फोन करून निहालचे वडील गौतम शिंदे यांना निहालचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी दिली. निहालचा मृतदेह मिळाला असला तरी त्याच्या सोबत गेलेला मित्र दीपेश वाघेलाचा काहीच तपास लागत नव्हता. दोन दिवसांनी म्हणजे १० डिसेंबरला भांडुप स्थानकात दीपेशचा मृतदेह मिळाला. हे दोन्ही तरुण रेल्वे अपघातामध्ये ठार झाल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. दीपेश व निहालच्या नातेवाइकांनी मात्र या प्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
दोन्ही तरुणांच्या शरीरावर मारहाणीच्या खुना असल्याची माहिती गौतम शिंदे यांनी दिली असून दोघेही रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले असतील तर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे. (वार्ताहर)
निहालच्या मोबाइलमध्ये असलेल्या फोटोमध्ये त्यांच्या सोबत आणखी तीन तरुणी असल्याचे दिसते. या तरुणींचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी गौतम शिंदे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी पत्र देवून केली आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्याची मागणी दीपेश व निहालच्या नातेवाइकांनी केली आहे.