कर्जत : खंडाळा घाटात मंकी हिल ते कर्जत दरम्यान महिन्याभरापासून सुरू असलेल्या विविध तांत्रिक कामांमुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रगती एक्स्प्रेस आदी एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने चाकरमानी व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
पावसाळ्यामध्ये मंकी हिल ते कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. पावसामुळे लोहमार्गाखालील माती, खाडी वाहून गेल्याने रेल्वेमार्गाचे नुकसान झाले. त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग सुरू करण्यात आला होता; पण रेल्वे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता ५ आॅक्टोबरपासून पुन्हा काही तांत्रिक कामे हाती घेतली आहेत. या कामामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द केला आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीला प्रवाशांचे हाल झाले.
आता ३० नोव्हेंबरपर्यंत मंकी हिल ते कर्जतच्या दरम्यान काम सुरू असल्याने काही गाड्या रद्द केल्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या रद्द केलेल्या गाड्यांमध्ये प्रगती एक्स्प्रेसचाही समावेश आहे. परिणामी, पुण्याहून कर्जतला येण्या-जाण्याकरिता पनवेल, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ किंवा कल्याण आदी ठिकाणच्या प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रगती एक्स्प्रेसच्या आधी डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना होते; परंतु तिचा कर्जतला थांबा नसल्याने अनेक प्रवाशांना लोणावळ्याला उतरून अन्य मार्गाने कर्जतला यावे लागते, त्यामुळे वेळ आणि पैसाही खर्च होतो. त्यामुळे प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.