पनवेल : आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून अडीच हजार रूपयांची लाच स्विकारताना खाजगी एजंटला रंगेहाथ पकडले. शुक्रवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. कळंबोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (29) असे या खासगी एजंटचे नाव आहे.
या आठवड्यातच पालिकेच्या कर्मचाऱ्याला अशाच प्रकारे लाच घेताना अटक करण्यात आली होती.ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे 21 नोव्हेंबर रोजी वाहन परवाना काढण्यासाठी खासगी एजंट अतिरिक्त पैसे मागत असल्याची तक्रार आली होती. लर्निंग लायसन्स 200, पक्के लायसन्स 900 असे एकूण 1100 रूपये असताना खासगी एजंटने तक्रारदाराकडून अडीच हजार रूपयांची मागणी केली होती. अडीच हजारापैकी दीड हजार रूपये पहिला हफ्ता म्हणून गुरूवारी देण्यात येणार होता. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीप्रमाणे ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आरटीओ खासगी एजंट भूषण कदम याला रंगेहाथ पकडले. ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.