जमिनीच्या मोबदल्यात वारसांना जिल्हा परिषदेत काम देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:15 AM2021-01-15T00:15:47+5:302021-01-15T00:16:09+5:30

जमीन बक्षीसपत्र; सोळा वर्षे शासन दरबारी नारायण पवार मारताहेत फेऱ्या

Demand for giving work in Zilla Parishad to heirs in exchange of land | जमिनीच्या मोबदल्यात वारसांना जिल्हा परिषदेत काम देण्याची मागणी

जमिनीच्या मोबदल्यात वारसांना जिल्हा परिषदेत काम देण्याची मागणी

Next

दासगाव : ऐतिहासिक पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ सभागृहाकरिता नारायण पवार यांनी आपली रस्त्याकडेला असलेली जागा घरातील मुलांपैकी कोणालाही जिल्हा परिषदेत सामावून घेण्याच्या तोंडी आश्वासनावर जिल्हा परिषदेला बक्षीसपत्र केली. मात्र गेली सोळा वर्षे नारायण बाबू पवार हे शासन दरबारी फेऱ्या मारूनदेखील प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पवार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत.

पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी शेजारीच जिल्हा परिषदेच्या मार्फत जिजाऊ यांच्या नावाने सभागृह बांधण्यात आले आहे. शिवाय या सभागृहाजवळ प्राथमिक मराठी शाळादेखील आहे. सभागृह आणि मराठी शाळा ज्या जागेत उभी आहे त्या जागेतील १० गुंठे जागा पाचाडमधील नारायण बाबू पवार यांनी सभागृह आणि शाळेकरिता दिली आहे. तत्कालीन आमदार माणिक जगताप आणि स्थानिक ग्रामस्थांच्या चर्चेतून फक्त दहा गुंठे जागा देण्याचे ठरले. मात्र प्रत्यक्षात १० गुंठ्याहून अधिक जमीन या ठिकाणी व्यापली गेली आहे. यामुळे दहा गुंठे जागा वगळून इतर जमीन मला परत करावी किंवा वारसांना कामावर घेण्याचे तोंडी ठरल्याप्रमाणे कामावर घेतले जावे, अशी मागणी नारायण बाबू पवार हे वृद्ध ग्रामस्थ करीत आहेत. हा पाठपुरावा त्यांनी जवळपास २००५ पासून सुरू केला आहे. सध्या या जागेत राजमाता जिजाऊ सभागृह आणि प्राथमिक मराठी शाळा उभी आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी स्थानिक प्रशासनापासून ते आमदार, खासदारांपर्यंत पत्रव्यवहार केला, मात्र कोणीही नारायण पवार यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.ग्रामस्थांच्या बैठकीत मान्य केलेली मागणी पूर्ण केली जावी शिवाय जेवढी जागा बक्षीसपत्र केली आहे त्यापेक्षा अधिक जागा व्यापली गेल्याने 
बाकीची जागा परत करण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. नारायण पवार हे आता वयोवृद्ध असल्याने किमान आपल्या वारसांना तरी या जागेचा मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दाद देत नसल्याने त्यांच्यासमोर मोठा यक्षप्रश्न आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण कुटुंब आमरण उपोषण करू, असा इशारा नारायण पवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

माझ्या वडिलांनी गेली वीस वर्षे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना न्यायाची विनंती केली, मात्र आजतागायत देण्यात आलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. आमच्या मागणीकडे रायगड जिल्हा परिषद दुर्लक्ष करत आहे.
- दीपिका पवार, मुलगी 

सदर प्रकरण जुने असून, याची पूर्ण माहिती घेऊन किंवा संबंधित शेतकऱ्याने पुन्हा मागणी अर्ज केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी अर्जाचा पाठपुरावा केला जाईल.
-नरेंद्र देशमुख, बांधकाम अभियंता, जिल्हा परिषद, महाड.  

Web Title: Demand for giving work in Zilla Parishad to heirs in exchange of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.