लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला : कोविड-१९ महामारीत शासनाने राज्यातील जनतेला रास्त भाव दुकानातून मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. शासन नियमानुसार धान्य वाटपात पेण तालुक्यातील फणस डोंगरी येथील रास्त भाव दुकानदार किरण वेखंडे यांनी लाभार्थ्यांना धान्य कमी देत फसवणूक केल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागेश जगताप यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाईची मागणी केली आहे.
शासन नियमानुसार पेण-फणसडोंगरीचे रास्त भाव धान्य दुकानदार किरण वेखंडे कोविड-१९ महामारीत सर्वसामान्य नागरिकांना धान्य कमी देत फसवणूक करत आहेत. याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीच्या भयंकर परिस्थिती रास्त भाव धान्य दुकानदार यांनी गोरगरीब अनुसूचित जाती, मागासवर्गीय अल्पसंख्याक नागरिकांचे हक्काचे धान्य न देता फसवणूक केली आहे. या प्रकाराची संबंधित विभागामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा जनहितार्थ आम्हाला योग्य त्या मार्गाने लढा देणे भाग पडेल, असा इशारा नागेश जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.