- दत्ता म्हात्रे पेण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाचा माघी गणेशोत्सव सोहळा शुक्रवार, ८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या गणेश जयंती वरद विनायक चतुर्थीच्या दिवशी माघी गणरायाचे आगमन होत असून माघी गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचे पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये दिसून येत आहे. मूर्तिकारांकडे तब्बल १००० च्या वर बाप्पांच्या सुबक मूर्तीची मागणी विविध शहरांमधून करण्यात आली आहे. यासाठी पेणमधील विविध कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामाला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळाच्या ६६ तर खासगी ९३४ गणेशमूर्ती तयार करून ५ ते ६ फेब्रुवारीपर्यंत गणेशभक्तांना देण्यासाठी लगबग सुरू असल्याचे दीपक कला केंद्राचे मूर्तिकार सचिन व नीलेश समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शुक्रवार, ८ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. माघ महिन्यातली विनायक, वरद, तिलकुंद चतुर्थीचा शुभयोग असून पूर्वापार गणेशमंदिरात थाटात साजरा होणारा या उत्सवाने आता गणेशभक्तांच्या हौसे मौजेखातर सार्वजनिक व खासगी अशा दोन्ही स्वरूपात माघी गणेशोत्सवाचे स्वरूप धारण के ले आहे. गेल्या दशकभरात या उत्सवाची क्रेझ चांगलीच बाळसे धरत मोठे स्वरूप धारण करीत आहे. सध्या माघ महिन्यात थंडी असूनसुद्धा पेणच्या गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याकडे मोठी लगबग सुरू आहे. ११ ते १२ फूट उंचीच्या सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती रंगविण्यासाठी कार्यशाळांमध्ये आणल्या जात आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या या गणेशमूर्ती कलाग्राम जोहे हमरापूर येथील कार्यशाळांमधून पेण शहरातील मूर्तिकार आणतात. ५ फूट उंचीपासून ८ फुटी, १० व १२ फूट उंचीच्या या भव्य गणेशमूर्ती या ठिकाणचे मूर्तिकार कच्च्या अर्थात न रंगविलेल्या गणेशमूर्ती तयार करून आणतात. फुटीच्या मोजमापानुसार त्यांची किंमत ठरलेली असते.पुणे येथून गणेशमूर्तींना मागणीपेण शहराचा लौकिक कोकणातील सांस्कृतिक शहर म्हणून केला जातो. गणेशमूर्तिकारांनी सातासमुद्रापार या शहराची ख्याती नेली. मूर्तिकारांमध्ये श्रीकांत देवधर, दीपक समेळ यांचे नाव आंतरराष्टÑीय स्तरावर घेतले जाते. पुणे येथून माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे कार्यशाळेतील कलाकारांनी सांगितले. गणेश मंदिरात विधिवत साजरा होणारा हा माघी गणेशोत्सव आता थेट घराघरात व सार्वजनिक सभामंडपात साजरा होतोय. पेणमधील विविध कार्यशाळांमध्ये पुणे, ठाणे, पालघर, वसई, पनवेल, उरण, खालापूर, मावळ व नाशिक, डोंबिवली येथील आॅर्डर बुकिंग केल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले.
माघी गणेशोत्सवासाठी पेणच्या मूर्तींना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:15 PM