पेण : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीत किल्ल्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. रायगड किल्ल्यावरुन अटकेपार झेंडे फडकविणारे मराठे, छत्रपतींनी उभा केलेला हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास व त्याचे साक्षीदार असलेले स्वराज्याचे वैभव म्हणजे गडकोट किल्ले. लहान मुलांना मातीपासून किल्ले बनविण्याचा छंद असतो. दिवाळीत हे किल्ले बनविले जातात, मात्र सध्या रेडिमेड किल्ल्यांना मागणी वाढली असल्याने प्लॅस्टर आॅफ पॅरिस पासून किल्ले बनविण्याचे काम पेणमधील कलाकारांनी सुरू केले आहे.पेणच्या दीपक कला केंद्राने तब्बल २००० ते २५०० पीओपीेचे रेडिमेड किल्ले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी होलसेल व रिटेल या स्वरुपात तयार केल्याची माहिती कार्यशाळेचे नीलेश समेळ यांनी दिली आहे. १०० रुपयांपासून १,५०० रुपयांपर्यंत एक फूट उंचीपासून तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले कार्यशाळेत तयार असून गतवर्षीपेक्षा एक हजार किल्ल्यांची मागणी या वर्षी वाढली आहे. आठ प्रकारातील हे किल्ले पीओपीचे असल्याने वजनाने हलके आहेत. त्यांची सहज ने - आण करता येते. शहरात या किल्ल्यांना मोठी मागणी आहे. (वार्ताहर)
दिवाळीसाठी रेडिमेड किल्ल्यांना मागणी
By admin | Published: October 26, 2015 12:59 AM