- दत्ता म्हात्रेपेण : मान्सून २० दिवस लांबल्याने पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांनी प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनवल्या जात असलेल्या गणेशमूर्तींचे काम थोड्या कालावधीसाठी थांबवून मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार शाडू मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती तयार करण्यावर अधिक भर दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजाची दखल मूर्तिकारांनी घेऊन मे व जूनमधील तब्बल ५० दिवस शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याकडे अधिक भर दिला आहे. नदीपात्रात सहजतेने विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक अशा मूर्तीची क्रेझ यावर्षी आहे. म्हणून वेळेचा सदुपयोग करून या इकोफ्रेंडली मूर्तीचे निर्माण मूर्तिकारांनी केली आहे. पेणमध्ये तब्बल दोन लाख मूर्तींची विविध कार्यशाळांमध्ये निर्मिती करण्यात आली आहे.या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेहींनी पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प गणेशभक्तांनी केला आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, लांबलेला मान्सून, भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, पाणीटंचाई या पर्यावरणाशी निगडित बाबींचा विचार करून पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या गणेशमूर्तींचीच मागणी होत आहे असे मूर्तिकार मंगेश हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. स्वच्छ भारत अभियानाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्रासाठी नागरी व ग्रामीण भागातील नद्या, तलाव, समुद्र खाड्या, विहिरी, शेततलाव, ओढे या ठिकाणी या मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्या लगेच विरघळून जातील. पर्यावरणस्नेहींनी ही संकल्पना उचलून धरल्याने शाडू मातीच्या गणेशमूर्तींना पेणच्या कार्यशाळांमधे गणेशभक्तांची मागणी वाढली आहे.गेले दोन महिने कडक उन्हात वाळवून या मूर्ती आता रंगकाम करण्यासाठी तयार झाल्या असून त्यावर रंगाचे कुंचले व स्प्रेगन मशिनद्वारे रंगांची शेड भरताना कारागीर व्यस्त आहेत. शाडू मातीच्या मूर्तीची मागणी मोठी असतानाही त्या मोठ्या प्रमाणात निर्माण करणे शक्य नसल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. यासाठी आपल्या कार्यशाळेमध्ये २० हजार मूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे, असे मूर्तिकार मंगेश हजारे यांनी सांगितले.पेणच्या मूर्तिकलेला मागणी आहे. येणाºया प्रत्येक गणेशोत्सवासाठी ही मागणी वाढत जाते. दरवर्षी २२ ते २५ लाख गणेशमूर्ती तयार होतात. नंतर त्या मागणीनुसार सबंध देशात व विदेशात जातात. एकूण ८५० ते ९०० कारखान्यात हे काम वर्षभर चालते. असे असताना देखील शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी तसा पुरवठा करण्याचे काम अवघड आहे. सध्या पाऊस नसल्याने मातीकाम करण्याचा अधिक वेळ मिळाला म्हणून गणेशभक्तांना या मूर्ती देता आल्याचे कला केंद्रातून सांगण्यात आले.
पेणमधील शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:18 AM