माथेरानमधील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:09 AM2020-07-22T00:09:35+5:302020-07-22T00:09:54+5:30
मनोज खेडकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
माथेरान: मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने याबाबत ठोस उपाययोजना राबविण्यासाठी लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याशिवाय ही होणारी वाढ आटोक्यात येणार नाही. याबाबत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना २१ जुलै रोजी निवेदन दिले आहे.
२००७ ते २००९ या दरम्यान आम्ही नगरपरिषदमध्ये सत्तेत असताना गावातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर, जवळपास मोठा कालावधी उलटून गेला असून, याकडे नगरपरिषदेने फारसे गांभीर्याने लक्ष केंद्रित न केल्यामुळे पुन्हा या भटक्या कुत्र्यांची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली दिसत आहे. माथेरानवासीयांचे संपूर्ण जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असते.
नेहमीच बाजारात ही मोकाट भटकी कुत्री नागरिकांना, तसेच पर्यटकांना त्रास देत असतात. याचा येथील पर्यटनावर विपरित परिणाम होत असतो. लवकरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले येथील सर्वांचे व्यवसाय पूर्वपदावर येणार आहेत. त्यामुळेच पर्यटनाला अडसर ठरणाºया या मोकाट भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण नगरपरिषदेने करावे, असे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.