बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 03:18 PM2024-06-15T15:18:06+5:302024-06-15T15:20:15+5:30
शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत.
उरण (मधुकर ठाकूर): उरण परिसरातील अनेक मच्छीमार बोटी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करीत आहेत.बंदी आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन केली आहे.
शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. एक जुन ते ३१ जुलै या ६१ दिवसांचा मासेमारी बंदीचा कालावधी आहे.मात्र बंदी आदेश झुगारून उरण येथील करंजा, मोरा, रेवस, दिघोडा, केळवणे, जिते आदी गावातील शेकडो मच्छिमार पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करीत आहेत.यामुळे मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत आहे.स्थानिक परवाना महिला अधिकारी प्रियंका भोये कारवाईचा बडगा उगारीत आहेत. परंतु वरिष्ठ पातळी वरुन त्यांना बळ देण्याची तसेच संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच अधिक कठोर कारवाई बाबत सक्षम कायदे करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन शनिवारी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन दिले आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चर्चा केली.चर्चेअंती शासनाचे आदेश धुडकावून पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर
मासेमारी करण्या-यांवर कुठलीही दयामाया न दाखविता कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्र्यांनी सचिवामार्फत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच अवैध मासेमारी करणाऱ्या नौका, मालक, तांडेल, खलाशी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन किमान तीन वर्ष सजा, मोठ्या रक्कमेचा दंड, नौका जप्ती करुन संबंधीत कौल, मासेमारी परवाने रद्द करुन नौका कापून नष्ट करणे,संबंधीत मच्छीमारांची घरे जप्ती करण्याबाबत बील तयार करण्याचे आश्वासनही यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, खजिनदार परशुराम मेहेर, पालघर महिला संघटक ज्योती मेहेर, मरोळ बाजार मच्छीमार संघटनेच्या अध्यक्षा राजश्री भानजी, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे उपाध्यक्ष प्रमोद आरेकर, भुवनेश्वर धनु, जयेश भोईर, प्रफुल्ल तांडेल,प्रवीण तांडेल, रवींद्र पांचाळ, गौरव पाटील, प्रतिभा भाटे आदी उपस्थित होते.