मधुकर ठाकूर
उरण : अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खोपटा पुल ते कोप्रोली नाका रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.तरी १५ सप्टेंबर ते १९ आँक्टोबर २०२३ या गणेशोत्सव काळावधीमध्ये सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.
जेएनपीए बंदरामुळे उरण पुर्व विभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे या कंटेनर यार्डमधून जेएनपीए बंदरात रात्री अपरात्री खोपटा पुल ते कोप्रोली नाका या रस्त्यावरुन अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास हा दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नोकरदार, विद्यार्थ्यी, प्रवासी, नागरिकांना सहन करावा लागत आहे.
त्यामुळे १५ सप्टेंबर ते १९ आँक्टोबर या गणेशोत्सव काळावधीमध्ये सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.यावेळी उरण वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या सह काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.