फोंडेवाडीत ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्रामपंचायत, पोलिसांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:05 AM2019-05-10T02:05:33+5:302019-05-10T02:06:20+5:30
कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
नेरळ - कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. येथील आदिवासी बांधवांनी पोलीस आणि ग्रामपंचायत विभागाकडे निवेदन देऊन फोंडेवाडीत कायमस्वरूपी संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात फोंडेवाडी भागात ६५ घरांची सुमारे ४०० आदिवासी बांधवांची वस्ती असलेली ही फोंडेवाडी साळोख धरणाच्या जवळच वसलेली आहे. बेरोजगारी व्यसनाधीनता व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे ही वाडी बदनाम झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या वाडीत अवैध दारूच्या भट्टी सुरू आहेत. वेळोवेळी पोलीस अधिकारी धाडी टाकून त्या उद्ध्वस्तही करतात; परंतु पुन्हा त्या राजरोसपणे सुरू ठेवल्या जातात, त्यामुळे या वाडीतील तरुण पिढी व्यसनाधीन बनत आहे. परिणामी, बेरोजगारीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचे अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे दिसून येते.
चार दिवसांपूर्वी याच वाडीतील योगेश भला नावाच्या तरुणाने दारूच्या नशेत आपल्या पत्नीचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मोरेवाडी येथे घडली आहे आणि या पूर्वी ही मारामाऱ्या, आपापसात वाद-विवाद तंटे घडलेले आहेत. केवळ या भागात होणाºया हातभट्टीच्या दारूमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. पुढच्या पिढी या व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडू नये, वस्तीवर शांतता प्रस्थापित व्हावी, याकरिता येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष शोएब बुबेरे, रायगड जिल्हा काँग्रेस आदिवासी संघटना रायगड अध्यक्ष परशुराम भला, यांच्या सहकार्याने ग्रामस्थ रामा पादिर, रामदास ठोंबरे, मनोहर भला, मोहन दरवडा, राजन हिंदोला, सुनील भला, हिरामण भला, पप्पू भला यांसह जयश्री ठोंबरे, लता भला, सोमी भला, मंजुळा पादिर, बच्ची भला, यमुना पारधी आदी महिलांनी फोंडेवाडीत संपूर्ण दारूबंदी व्हावी, याकरिता पुढाकार घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत दारूबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याकरिता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या ठिकाणी दारूविक्रीचा व्यवसाय करणाºया काही व्यक्तींनीही दारूचा गुत्ता बंद करून ग्रामस्थांच्या या निर्णयात सहभाग घेतला आहे.
आमच्या वाडीत दारूच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे, कामधंदा नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबावर परिणाम होत आहे. घरात तंटे होत आहेत, महिलावर्गाला त्याचा त्रास होत आहे, त्यामुळे आमच्या वाडीत दारूबंदी झाली पाहिजे.
- जयश्री पांडुरंग ठोंबरे, ग्रामस्थ, फोंडेवाडी
आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला की, गावामध्ये दारूची निर्मिती व विक्री कायमस्वरूपी बंद करावी. कारण या गावातील दारूभट्टींमुळे आजूबाजूच्या वाडी-वस्तीतील लोकही दारू पिण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे या वाडीतील तरुण पिढी व्यसनाधीन बनली आहे, त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. विशेष करून, महिलावर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे या गावातील तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले असून, काही दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत येथील तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. त्यामुळे या गावात संपूर्णपणे दारूबंदी व्हावी, अशी शासनाकडे विनंती आहे.
- शोएब बुबेरे, तंटामुक्ती अध्यक्ष,
साळोख ग्रा. प.