नांदगाव/ मुरुड : विकास आढावा बैठकीत मुरुड येथील आगाराला डिझेल पंप असूनसुद्धा अलिबाग येथील आगारातून डिझेल भरावे लागत असल्याने थेट प्रवास करणा-या प्रवाशांना विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. डिझेल पंप असतानासुद्धा अलिबाग येथे डिझेल भरण्याचा हट्ट विभाग नियंत्रक का करतात? असा प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आमदार पंडित पाटील यांनी दरबार हॉल सभागृहातूनच विभाग नियंत्रकांना फोन वरून संवाद साधून तातडीने मुरु ड आगारातून डिझेल सुरू करा, असे सांगितले. त्या वेळी लवकरच डिझेल सुरू करतो, असे आश्वासन देऊन आज या घटनेला महिना पूर्ण झाला, तरी ही मागणी मंजूर न झाल्याने असंख्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीआहे.संपूर्ण रायगड जिल्ह्यातून श्रीवर्धन व मुरु ड आगारालाच असा नियम लावण्यात आला असल्याची माहिती समजली असून, इतर कोणत्याही आगाराला अशी सक्ती करण्यात आलेली नाही. स्थानिक आमदारांनी फोन करूनसुद्धा मुरु ड आगारातून डिझेल सुरू झालेले नाही. यामुळे भविष्यात याचा गहन प्रश्न येथे निर्माण झाला आहे. याबाबतचे मुरु ड शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण बैकर यांनी निवेदन दिले होते.मुरु ड आगरात डिझेल पंप आहे; परंतु डिझेल आणण्याची परवानगी नसल्याने अलिबाग येथील आगारातून भरावे लागत आहे. त्यामुळे थेट प्रवास करणा-या असंख्य प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत मुरु ड आगारप्रमुख युवराज कदम यांच्याशी संपर्क साधला असता, वरील वस्तुस्थिती सत्य असून हा धोरणात्मक निर्णय घेतला गेला आहे. कारण अलिबाग-मुरु ड हे ५० किलोमीटरचे अंतर असल्याने प्रतिलिटर डिझेलला ५० पैशांची बचत होते, त्यामुळेच हे अंतर कमी करून अलिबाग येथे डिझेलची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी गाड्या डिझेलसाठी अलिबागला, मुरुडमध्ये व्यवस्था करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:23 AM