अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट गहिरे होत असतानाच अलिबाग तालुक्यातील रेवस गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना आणि डेंग्यूमध्ये समान लक्षणे दिसून येतात. त्यामुळे तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या एका कुंडामध्ये अळ्या सापडल्याने डेंग्यूचा फैलाव झाल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.कोरोनाशी लढत असतानाच आता डेंग्यूच्या रोगाने डोके वर काढले आहे. कोरोना आणि डेंग्यूच्या लक्षणांमध्ये बºयाच प्रमाणात समानता आढळते. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. रेवस गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने गावाला भेट दिली आणि पाहणी केली. रेवस येथे तापाचे एकूण नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वांना डेंग्यूसदृश तापाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे तेथील तीन रुग्णांची टेस्ट केली असता तीनपैकी दोन रुग्णांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्व रुग्णांवर उपचार केले जात आहेत, अशी माहिती अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे यांनी ‘लोकमत’ला दिली.गावामध्ये एक कुंड आहे. या कुंडामध्ये ठरावीक वेळेला पाणी सोडण्यात येते. त्याच पाण्याचा वापर ग्रामस्थ करतात. यातील गंभीर बाब म्हणजे याच कुंडाची पाहणी केली असता. त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. खबरदारी म्हणून तातडीने शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फॉगिंग, फवारणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी पाणी शुद्ध करून पिणे गरजेचे आहे. तसेच परिसरात स्वच्छता राखावी, मच्छरदानीमध्ये झोपावे.- डॉ. अभिजित घासे,तालुका आरोग्य अधिकारी
अलिबागमधील रेवसमध्ये सापडले डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 6:55 AM