जे.एस.डब्ल्यू कंपनीत डेंग्यूचे संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:59 PM2019-06-01T22:59:50+5:302019-06-01T23:00:16+5:30
रक्ताचे नमुने मुंबईत तपासणीसाठी । ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कंपनीला पत्र
पेण : पेण येथील डोलवी गावच्या हद्दीत असणाऱ्या जे.एस.डब्ल्यू. कंपनीतील कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे गडब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यविषयक पाहणी अहवालात निष्पन्न झाले आहे. कंपनीतील ११ कामगारांना डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक अहवालातील माहिती गडब प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा म्हात्रे यांनी तपासणी केलेल्या वैद्यकीय अहवालात दिली आहे. यातील रुग्णाच्या रक्ताचे नमुने जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात आले असून तेथील अहवाल आल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. हे सर्व कामगार परप्रांतीय असून कंपनीने बांधलेल्या वडखळ येथील निवाराशेडमध्ये वास्तव्यास आहेत.
कंपनीच्या फिल्डमधील काम सुरू असलेल्या एलएनटी आणि टाटा प्रोेजेक्ट साइडवर डेंग्यू आणि डासांचा फैलाव व डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले आहे. यातील डेंग्यूची लागण झालेल्या ५ कामगारांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग तर ६ कामगारांना प्राथमिक आरोग्य केंदाकडे गडब येथे उपचारार्थ दाखल केले आहे.
जे.एस.डब्ल्यू कंपनीत फिल्डवर काम चालू असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या व डासांचा उपद्रव असून त्याबाबत आरोग्य पथकाच्या तपासणी अहवालात आढळले आहे. यातील लागण झालेले ११ संशयित रुग्ण उपचारार्थ अलिबाग व पेण येथे दाखल करण्यात आले.
कामार्लीत दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण
कामार्ली येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने परिसरातील ३० ते ३५ गावकऱ्यांना अतिसार, उलटीची लागण झाली. संबंधित रुग्णांना पेण उपजिल्हा रुग्णालय, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रुग्णांना औषध, गोळ्या देऊन सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही अनेकांना फरक न पडल्याने अनेकांनी पेण शहरात धाव घेतली. पेण उपजिल्हा रुग्णालयात १७, खासगी दवाखान्यात आठ व कामार्ली येथे दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पेण तालुका आरोग्य अधिकारी, पेण तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी
केली आहे.