CoronaVirus News in Raigad: आदिवासींच्या मदतीसाठी विभाग सरसावला, प्रकल्प अधिकारी लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 01:14 AM2020-05-02T01:14:25+5:302020-05-02T01:14:35+5:30
राज्याचा आदिवासी विकास विभागसुद्धा सर्वोतोपरी मदतीसाठी सरसावला आहे.
संजय गायकवाड
कर्जत : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली, याचा सर्वाधिक फटका हा मजुरी करणाऱ्या कष्टकरी समूहाला बसला. या टाळेबंदीमध्ये आदिवासींची परवड थांबवण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. राज्याचा आदिवासी विकास विभागसुद्धा सर्वोतोपरी मदतीसाठी सरसावला आहे.
आरोग्य तपासणी, रेशनकार्ड काढून देणे, गरोदर महिला, स्तनदा माता व सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना घरपोच आहार देणे यासारख्या योजना आखून त्या प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. आदिम जमात असणाºया कातकरी आदिवासींना धान्य देण्यासाठी सर्व जिल्ह्यात सर्व्हे करण्यात येत असून लवकरच प्रत्येक कातकरी कुटुंबांना आदिवासी विकास विभागामार्फत रेशन वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती एकात्मिक आदिवासी. विकासचे प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांनी दिली आहे. आदिवासी समूहाची अन्नावाचून आबाळ होऊ नये म्हणून सरकारच्या वतीने कातकरी कुटुंबांना अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड दिले आहेत. या कार्डावर ३५ किलो धान्य देण्यात येते. रायगड जिल्ह्यात अनेक कातकरी कुटुंबांतील सदस्यांकडे रेशन कार्ड नाहीत, अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या निकालामध्ये न्यायालयाने एकही कुटुंब अंत्योदय योजनेपासून वंचित राहू नये, असे आदेश सरकारला दिले होते.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत एक आठवड्याची विशेष मोहीम जिल्हाभरात राबविण्यात यावी व कार्डापासून वंचित कातकरी कुटुंबांना अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले. या मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर आहे. जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार प्रकल्प कार्यालयाने प्रत्येक तालुक्यात दोन शिक्षकांची नियुक्ती करावी तसेच विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे.
।अँपद्वारे जिल्ह्यातील सर्व कातकरी कुटुंबांच्या माहितीचे संकलन सुरू
आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने आदिम जमातीच्या कुटुंबांसाठी राज्यभर मोफत धान्यवाटपाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आदिम जमात असणारी कातकरी ही जमात संख्येने सर्वात जास्त रायगड जिल्ह्यात राहते. आदिवासी महामंडळाच्या धान्यवाटपापासून आदिवासी कातकरी वंचित राहू नये यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून एका अॅपद्वारे जिल्ह्यातील सर्व कातकरी कुटुंबांची अपडेट माहिती संकलित करणे सुरू आहे. जिल्ह्यातील कातकरी विकास धोरण समितीच्या गाव कार्यकर्त्यांमार्फत तसेच ग्रामसेवक व स्थानिक सामाजिक संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे.
।रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाड्यांमध्ये ग्रामसाथी व ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येणाºया सर्व्हेमध्ये सहकार्य करावे तसेच प्रत्येक गटविकास आधिकाºयाने तातडीने आपापल्या तालुक्यातील कातकरी कुटुंबांची माहिती अपडेट करून जिल्हा प्रशासनास कळवावे.
- सुधाकर घारे, उपाध्यक्ष,
रायगड जिल्हा परिषद
>रायगडमध्ये आदिवासी कातकरी कुटुंबांचा सर्व्हे सुरू आहे. हा सर्व्हे करण्यासाठी ग्रामसाथींची मदत घेतली जात आहे. ग्रामसाथींना मदत करावी, असे आवाहन मी करते, सर्व्हेमधील सर्व माहिती महामंडळाला कळविली जाईल.
- शशिकला आहिरराव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रायगड