पेण : पेण अर्बन बँक घोटाळ्याला तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटून देखील ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांच्या ठेवी न मिळाल्याने तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत अनेक वेळा जाहीरपणे सांगून देखील पेण अर्बन ठेवीदारांचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. यामुळे पेणच्या महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात ठेवीदारांच्या घेण्यात आलेल्या बैैठकीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर २५ फे ब्रुवारीलाधडक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पैसे मिळाल्याशिवाय परतायचे नाही, आता नाही तर कधीच मिळणार नाही, हा ध्येयवाद जपत वर्षावर धडक देण्याचा निश्चय करत मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा इशारा गुरु वारी पेण येथील बैठकीत देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकांच्यावेळी, सभागृहात जो निर्णय घेतला होता तो म्हणजे जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्यामधून मिळणाऱ्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे द्यावेत या त्यांनी जाहीरपणे वक्त व्य केलेल्या निर्णयाची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी करावी व दुसरी मागणी म्हणजे ज्या मालमत्तांवर मुक्त संचालनालय (इडीने)बोजा चढविला आहे तो हटविण्यात यावा, जेणेकरून या मालमत्तांचा लिलाव सिडको करणार आहे,ज्या मालमत्ता नैना प्रकल्प क्षेत्रात समाविष्ट आहेत त्यांचा लिलाव व्हावा, ही सर्व प्रक्रिया निवडणुकीपूर्वी करण्यात यावी असा सूर या बैठकीत उमटला. या दोन प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेण अर्बनचे ठेवीदार २५ फेब्रुवारी मंगळवारी सकाळी ७ वा. पेणमधून, रेल्वे, बस, खासगी वाहने यामधून कर्जत, नेरळ, उरण, खालापूर येथून ठेवीदार मुंबईकडे प्रयाण करतील. कमला नेहरू पार्क येथे जमून ते थेट वर्षा बंगल्याकडे धडक देणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैैठकीच्या वेळी पेण अर्बन संघर्ष समितीचे अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.