ठेवीदारांचा कर्नाळा बँकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:42 PM2020-02-13T23:42:03+5:302020-02-13T23:42:26+5:30

कारवाईची मागणी : सभासदांसह खातेदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश

Depositors March On Karnala Bank | ठेवीदारांचा कर्नाळा बँकेवर मोर्चा

ठेवीदारांचा कर्नाळा बँकेवर मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कर्नाळा बँकेच्या व्यवहारातील अनियमिततेमुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊनदेखील खातेदारांना पैसे मिळत नसल्याने ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी पनवेलमधील कर्नाळा बँकेच्या शहरातील मुख्य शाखेवर मोर्चा काढण्यात आला.


कर्नाळा बँकेत ५१२.५0 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केला आहे. बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर विसंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केला. या सर्व प्रकरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून, त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडो खातेधारक सहभागी झाले होते. बँकेत ६३ बोगस कर्जखाती तयार करण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. कर्नाळा बँकेच्या एकूण ६३३ कोटी रुपये कर्जापैकी ५१२ कोटी ५५ लाख रुपयांची कर्जे बोगस असल्याचे सहकार खात्याच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही सर्व कर्जे प्रत्यक्ष कर्जदारांनी न घेता विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांमध्ये वापरल्याचे अहवालातून जाहीर झाल्याचे किरीट सोमय्या यांनी या वेळी सांगितले.


या वेळी ठेवीदारांना समर्थन देण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष वासुदेव घरत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, पनवेल उपाध्यक्ष संजय पाटील, पंढरीनाथ फडके, के. ए. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: Depositors March On Karnala Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक