कर्जत - कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या १२ आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या या विजेपासून वंचित आहेत. रस्त्यापासून वंचित असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक असून, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.कर्जत या आदिवासीबहुल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या या रस्ता आणि विजेपासून वंचित आहेत. माथेरानच्या डोंगरात १२ आदिवासी वाड्या वसल्या असून, या आदिवासी वाड्यांना अद्याप रस्त्याची सुविधा मिळालेली नाही. वनजमिनीवर वसलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे हे लोक वन विभागाच्या दळी जमिनीवरील रस्ता श्रमदान करून तयार करतात.नेरळ-माथेरान घाटरस्त्यात जुम्मापट्टी धनगरवाडा सोडल्यानंतर पुढे असलेल्या आदिवासी वाड्या या रस्त्यापासून वंचित आहेत. त्यात बेकरेवाडी, आसलवाडी, भूतिवलीवाडी, धामणदांड, नाण्याचा माळ, पाली धनगरवाडी, आषाणेवाडी, सावरगाव वाडी, किरवली वाडी या ठिकाणी दुर्गम भागांत आदिवासी लोकवस्ती करून राहत आहेत. दरवर्षी आदिवासी लोक श्रमदान करून रस्ता करतात आणि त्यावर आपली वाट शोधत असतात. आदिवासी ग्रामस्थांनी श्रमदान करून आसलवाडीपर्यंत पायवाट बनवली आहे; पण तो रस्ता पुढे जात नसल्याने सागाचीवाडी, चिंचवाडी आणि आसल ग्रामपंचायतीमधील वाड्या या वाहने जाणाºया रस्त्याबरोबर पायवाटेनेही आपल्या घरी सुखरूप पोहोचत नाहीत. आसल आणि माणगाव ग्रामपंचायतीमधील या वाड्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा मिळविण्यासाठी नेरळ येथे यावे लागते, तर बेकरे येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक सोय उपलब्ध नसल्याने आदिवासी लोकांचे आरोग्य हे प्रामुख्याने आपल्याकडे जंगलात असलेल्या आयुर्वेदिक औषधे यांच्यावर अवलंबून असते. त्यात मोठ्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वाडीमधील दहा-पंधरा तरुणांना एकत्र येऊन डोली करावी लागते, तर आसल ग्रामपंचायतीमधील रुग्णांना सागाची वाडी येथून डोंगर उतरून भूतिवली गावात आणावे लागते. तेथून डांबरी रस्त्याने रायगड हॉस्पिटल किंवा सरकारी दवाखान्यात जाण्याची व्यवस्था करावी लागते. माणगाव ग्रामपंचायतीमधील आदिवासी रुग्णाची प्रकृती बिघडली, तर त्यांना जुम्मापट्टीपर्यंत डोलीमध्ये घालून पावसाचा त्रास वाचवत न्यावे लागते. त्यानंतर, पुन्हा रिक्षा अथवा अन्य वाहनांनी न्यावे लागते. रस्त्याची सुविधा आदिवासी लोकांना उपलब्ध नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.रहिवाशांचे हाल1सागाची वाडी येथील संदीप निरगुडे हा तरुण पायाला दुखापत झाल्याने घरात झोपून होता. मागील काही दिवस जोरदार पाऊस होत असल्याने पाऊस थांबण्याची वाट या तरुणाने पाहिली आणि ती त्या तरुणाच्या अंगलट आली. पावसाचा जोर कमी झाल्यावर त्या तरुणाला चालताही येत नसल्याने अखेर वाडीतील तरुणांनी डोली करून भूतिवली गावापर्यंत आणले आणि त्यानंतर नेरळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.2तशीच परिस्थिती बेकरेवाडी येथील भीमा पारधी यांच्याबाबत २६ आॅगस्ट रोजी घडली असून, त्या आजीबार्इंना आजारपणामुळे चालताही येत नव्हते. शेवटी जैतु पारधी आणि वाडीमधील आदिवासी यांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. बेकरेवाडी येथून जुम्मापट्टी धनगर वाड्यापर्यंत आणले आणि तेथून नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.3आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते जैतु पारधी यांनी याबाबत शासनाला वनजमिनीतून रस्ते बनविण्याचे आवाहन केले आहे; तर आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निगुर्डे यांनी रस्ता, वीज आणि पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माथेरानच्या डोंगरातील सर्व आदिवासी एकत्र येऊन उपोषण करू, अशी भूमिका घेतली आहे.
माथेरानच्या डोंगरातील १२ वाड्या रस्त्यापासून वंचित, आदिवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:56 AM