आदिवासी वाड्या सुविधांपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:13 PM2019-10-14T23:13:44+5:302019-10-14T23:14:06+5:30
कर्जतमधील आदिवासींचे हाल : रु ग्णांना चादरीच्या डोलीतून न्यावे लागते उपचारासाठी
नेरळ : मुंबईपासून हाके च्या अंतरावर असलेल्याकर्जत तालुक्यात विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांचे लक्ष आदिवासी भागातील वाड्या पाड्यापर्यंत जात नसल्याने, तालुक्यात आजही काही ठिकाणी आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना रस्त्याअभावी आजारी व्यक्तीस डोलीच्या आधाराने रुग्णालयात पोहोचवावे लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहे. नेते कार्यकर्ते गावा गावात, वाड्या-पाड्यात फिरून मतांचा जोगवा मागत आहेत. एरव्ही ढुंकूनही न पाहणारे राजकारणी आत्ता मात्र निवडणूक काळात प्रचारासाठी आदिवासी भागातील रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आश्वासनाची खैरात वाटत आहेत. आम्ही हे करू आम्ही ते करू अशा प्रकारे विकासाची स्वप्न दाखवत आहेत. मात्र, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही आजतागायत या भागांचा विकास झाला नाही. किमान रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून ही वंचित राहिल्याचे दिसत आहेत. आजही आदिवासी महिलांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करावे लागत असून, अनेक ठिकाणी रस्तेच नाहीत, तर असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे आदिवासींचे हाल होत आहेत.
मूलभूत सुविधा देण्याची मागणी
१काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथील सखू नारायण पारधी या महिलेला दवाखान्यात उपचारासाठी चादरीची डोली करून नेण्यात आले.
२रस्त्या अभावी या वाडीत कोणतेही वाहन पोहोचत नाही, अशीच स्थिती चिंचवाडी, अशेनेवाडी, सागाची वाडी, भूतीवली वाडी, बोरीची वाडी, धामण दांडा या आदिवासी वस्त्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.
३विकास राहिला दूर निदान मूलभूत सुविधा तरी आम्हाला मिळाव्यात अशी माफक अपेक्षा दुर्गम भागातील नागरिक करत आहेत.
एक महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचे रु ग्णालयात निधन झाले, त्यांना घरी अंत्यविधीसाठी नेण्यासाठी आम्हाला डिकसल पाली ते चिंचवाडी हे एक तासभराचे अंतर मृतदेहाला चादरीची डोली करून न्यावे लागले. आमच्या वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही. पाणी फक्त पावसाळ्यातच उन्हाळी दिवसात डवरे खोदून पाणी शोधावे लागते.
- अरविंद सुतक, ग्रामस्थ चिंचवाडी
आमच्या भागातील वाड्यांना पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे आजारी माणसाला चादरीची झोळी करून न्यावे लागते. कोणतेही वाहन वाडीत जात नाही, मला रोज चालतच कामाला यावे लागते.
वाडीजवळच पाली भूतीवली धरण आहे, तरी आमच्या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई असते.
-बाळू कमळू पारधी,
ग्रामस्थ, भूतीवलीवाडी