फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 04:47 PM2024-04-16T16:47:13+5:302024-04-16T16:51:08+5:30
लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मधुकर ठाकूर, उरण : मान -अपमानाची जोखड बाजूला सारून आणि एक दिलाने काम करुन महाविकास आघाडीचे मावळ उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व रायगड लोकसभा मतदारसंघातील अनंत गीते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध विभागांचे कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.जागा वाटपावरून काही ठिकाणी पक्षात नाराजी असली तरीही देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवून ते टिकवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासाठी कॉग्रेस महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी एकदिलाने काम करीत आहे.मावळ, रायगड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील व अनंत गीते यांच्या विजयासाठी कॉग्रेसचे पदाधिकारी निवडणूकीत कामाला लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका वेगळी असणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महेंद्र घरत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री अशी खोचक टीका केली.
नारायण राणे यांना अद्यापही उमेदवारीसाठी झटावे लागत आहे.तर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सरकारमध्ये सामील होणार की, जेलमध्ये जाणार अशी धमकी मिळताच ते निमूटपणे सरकारमध्ये सामील झाले असल्याची टीकाही महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केली.निवडणूकांचे निकाल जाहीर होताच ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय यांच्या चौकशीच्या भीतीने भाजपात दाखल झालेले विविध राजकीय पक्षांचे बहुतांश नेते, पुढारी पुन्हा माघारी पक्षात सामील होतील अशी भविष्यवाणीही घरत यांनी केली.
ना खाऊंगा , ना खाने दूंगा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे.भडकती महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी , कामगार आदींच्या प्रश्नांवर केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. केंद्र सरकारच्या या हिटलरशाही व मनमानी कारभाराला आता जनता पार कंटाळली आहे.त्यामुळे देशभरात मोदी विरोधात लाट उसळली आहे.त्याचा सर्वाधिक फायदा विरोधकांनाच होणार असल्याने केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार स्थापन होईल असा दावा करतानाच हुकूमशाही पद्धतीच्या राजवटीला उलथून टाकण्याचे आवाहन कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे , काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, काँग्रेसच्या रायगड महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर , महिला तालुका अध्यक्षा रेखा घरत तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.