उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ
By राजेश भोस्तेकर | Published: December 29, 2023 07:02 PM2023-12-29T19:02:10+5:302023-12-29T19:02:22+5:30
अलिबाग वनविभागातील वनमजूर हे गेली तीन वर्षापासून आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी लढा देत होते.
अलिबाग : अलिबाग वनविभागातील वनमजूर हे गेली तीन वर्षापासून आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी लढा देत होते. नव्याने अलिबाग उप वनसंरक्षक म्हणून आलेले राहुल पाटील यांनी वन मजुरांचा प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने सोडवून ४८ वन मजुरांना १० वर्षाचा लाभ मंजूर करून दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्व संध्येला वन मजुरांना नव वर्षाची भेट मिळवून दिली आहे. याबाबत वन मजूर यांनी राहुल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले आहे.
वन मजूर हे वन विभागात कार्यरत आहेत. वनात अधिकाऱ्यांसोबत हे वन मजूर काम करतात. शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे दहा, वीस, तीस वर्ष नोकरी झाली की त्यांना त्या त्या टप्यावर वेतन आणि भत्ता वाढ केली जाते. वन मजूर यांनाही आश्र्वासित प्रगती योजना लागू आहे. मात्र अलिबाग वनविभागात कार्यरत असलेले वन मजूर हे गेली काही वर्ष या योजनेपासून वंचित राहिले होते. तीन वर्षापासून वन मजूर हे आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रशासन, शासन स्तरावर मागणी करीत होते. मात्र त्यांना यश आले नाही.
अलिबाग उप वन संरक्षक म्हणून राहुल पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वन मजूर यांनी आपला प्रलंबित प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. वन मजूर यांना प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ४८ वन मजुरांना त्याचा हक्क मिळवून दिला आहे. वन मजुरांना १० वर्षाचा लाभ मिळवून दिल्याने त्याच्या पगारात आणि भत्यात नव वर्षापासून वाढ होणार आहे.